देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात वाघाने धुमाकूळ घातला असून गुरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. नामदेव गेडाम (६५ रा. जेप्रा) असे मृताचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यात महिनाभरापासून ‘सीटी – १’ या नरभक्षी वाघाची दहशत आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग अनेक दिवसांपासून प्रयत्नरत आहे.

हेही वाचा >>> गडचिरोलीमधील देसाईगंजमध्ये रानटी हत्तींची मनसोक्त जलक्रीडा

दरम्यान, गडचिरोली वनविभागात येणाऱ्या जेप्रा येथील शेतकरी नामदेव गेडाम गुरुवारी दुपारच्या सुमारास गुरे चरायला दिभणा जंगल परिसरात गेले होते. यावेळी त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. जवळपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. लागोपाठ होत असलेल्या वाघाच्या हल्ल्यांमुळे परिसरात प्रचंड दहशत असून तत्काळ वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी घेऊन आरमोरी येथे संतप्त नागरिकांनी चक्काजाम केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी मध्यस्थी केल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.वन विभागाकडून परिसरातील नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, गावकरी जंगलाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे वाघाच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.