अकोला:अकोला रेल्वेस्थानकावर धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात एक महिला फलाट व रेल्वेच्या मध्यात पडली. काही क्षणातच उपस्थित नागरिकांनी त्या महिलेला बाहेर ओढून जीव वाचवला. हे दृश्य पाहून रेल्वेमध्ये चढलेल्या त्या महिलेच्या मुलीनेही धावत्या गाडीतून फलाटावर उडी मारली. दैव बलवत्तर म्हणून दोन्ही मायलेकी सुखरूप आहेत. अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर बुधवारी रात्री ही घटना घडली. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हेही वाचा >>>चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक वाशीम येथील बेबी मधुकर खिलारे आपल्या मुलीसह अमरावती एक्सप्रेसने मुंबईला जात होत्या. त्या रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या, त्यावेळी नुकतीच गाडी सुटली होती. आई आणि मुलीने धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. मुलगी रेल्वेत चढली. मागून आईने चढण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वे आणि फलाटाच्या मधात पडल्या. त्या रेल्वे खाली जात असतांनाच उपस्थितांनी त्यांना क्षणार्धात बाहेर ओढले आणि त्यांचा जीव वाचवला. आपल्या आईला पडताना पाहून मुलीनेही थोड्या अंतरावर चालत्या रेल्वेतून उडी घेतली. आई आणि मुलगी दोघीही सुखरुप असून त्या आपल्या प्रवासासाठी रवाना झाल्या आहेत.