Premium

नागपूर : बांधकाम व्यावसायिकाला पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला वकिलाला अटक

महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असल्याचे सांगून एका महिला वकिलाने आपल्या साथिदाराच्या मदतीने एका बांधकाम व्यावसायिकाला ५ लाखांची खंडणी मागितली.

gang arrested for girl sold for marriage
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

नागपूर : महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असल्याचे सांगून एका महिला वकिलाने आपल्या साथिदाराच्या मदतीने एका बांधकाम व्यावसायिकाला ५ लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी महिला वकिलासह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. नसरिन हैदरी आणि संजय शर्मा अशी खंडणीबहाद्दरांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटक्यात राहणारे रमेश आसूदानी यांची निर्माण ग्रेस नावाने कंपनी आहे. त्यांची टीव्ही टॉवरजवळ पशुवैद्यकिय महाविद्यालयाच्या मागे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आसूदानी यांनी लुबाडण्याचा कट महिला वकिल नसरिन हैदरी आणि तिचा साथिदार संजय शर्मा यांनी रचला. गेल्या आठवड्यात दोघांनीही आसूदानी यांच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन छायाचित्र काढले. तेथील ठेकेदाराकडून आसूदानी यांच्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेतला. त्याला फोन करुन बांधकाम अवैध असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले. बांधकामाच्या परवानगी व्यवस्थित घेतल्या नाहीत तसेच महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी नसरीन हैदरी यांना दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींचा निपटारा केल्यानंतरच पुढील बांधकाम करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी धमकी देऊन बांधकामाच्या परवानगीचे कागदपत्र कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर : धक्कादायक! चक्क कैदी आणि पोलिसाने केली पार्टी..

घाबरलेल्या मुलाने वडिलांना माहिती दिली. त्यांनी नसरीन यांना फोन करून कागदपत्रे बघण्यासाठी कार्यालयात बोलावले. नसरीन आणि संजय शर्मा दोघेही जरीपटक्यातील आसूदानी यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी बांधकामाची परवानगी देण्याच्या नावावर आणि तक्रारींची फाईल बंद करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम बंद पाडण्याची धमकी दिली. आसूदानी यांनी लगेच गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाई करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे आसूदानी यांनी नसरीन हैदर आणि संजय शर्मा यांना खंडणी देण्याची तयारी दर्शविली. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख शारीन दुर्गे, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, कर्मचारी चेतन जाधव, सुधीर सौंदरकर, नितीन वासने, अनिल बोटरे आणि पूनम शेंडे यांनी जैस्वाल हॉटेलजवळ सापळा रचला. खंडणीची रक्कम स्विकारताना पोलिसांनी दोघांनाही अटक केली. खंडणीच्या प्रकरणात अटक झालेली नसरीन हैदर ही पहिलीच महिला वकिल असल्याची माहिती समोर आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A woman lawyer who demanded an extortion of five lakhs builder was arrested adk 83 ysh

First published on: 02-06-2023 at 12:48 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा