नागपूर : नागपुरातील जानकी टॉकीज परिसरात नाल्याला पूर आला. पाण्याची पातळी वाढत असतानाच आई-लेक त्यात अडकल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी मंगला वाकडे हिला कळली. त्यांनी घटनास्थळी स्वतः धाव घेत स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोघांना वाचवले. महिला अधिकारी स्वतः पोहून महिलेच्या घरी पोहोचली हे विशेष. हेही वाचा - नागपूरसह विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, येत्या ४८ तासांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार हेही वाचा - नागपूर अतिवृष्टी : बचाव पथकाची ७ गटांत विभागणी, १४० लोकांना सुखरूप हलवले नागपुरातील जानकी नगर परिसरात पहाटे ५ वाजता पूर येऊन पाणी तुंबले. पुराच्या पाण्यात सुनीता तिवारी ही महिला व तिची मुलगी अडकल्याची माहिती धंतोली पोलिसांना मिळाली. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक मंगला वाकडे तातडीने तिथे पोहोचल्या. त्यांना पुराच्या पाण्याने पूर्ण टॉकीजला वेढले असून पाणी वाढतच असल्याचे दिसले. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जानकी टॉकीज येथे पाण्याच्या तेज प्रवाहात पोहून दोरी बांधली. येथील घराच्या छतावर चढून त्यांनी अडकलेल्या महिला या मुलीला लोखंडी गेटच्या मदतीने पाण्याजवळ उतरवले. अंधारामुळे त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यानंतर खासगी लोकांसह अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढले गेले. दोघांनीही शेवटी हात जोडून महिला अधिकाऱ्याचे आभार मानले.