गोंदिया: खातेदाराने जमा करण्यासाठी दिलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करणे, तसेच खातेदारांच्या बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या खात्यातून पैसे विड्राल करून महिला डाकपालाने १ लाख ६३ हजार रुपयांची अफरातफर केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी उपविभागीय डाक निरीक्षक यांच्या तक्रारीवरून आरोपी डाकपाल जयश्री ओमप्रकाश टेकाम, रा. बेरडीपार हिच्यावर तिरोडा पोलिस येथे शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार आरोपी जयश्री टेकाम
या तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये डाकपाल पदावर कार्यरत असताना, तिला खातेदार उषाबाई वासुदेव खोब्रागडे, रा. ठाणेगाव यांनी २६ जुलै २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत एक लाख १० हजार रुपये ठाणेगाव शाखा पोस्ट ऑफिसला येऊन आपल्या बचत खाते क्रमांक ८९५७६४३७४३ मध्ये भरण्यासाठी जयश्री टेकाम हिला दिले होते. जयश्री टेकाम हिने एकूण १ लाख १० हजार रुपये खातेदाराच्या खात्यामध्ये जमा न करता आपल्या व्यक्तिगत कामासाठी वापरली. तसेच, खातेदार संजय रामटेके यांनी २२ जून २०२३ ला दोन हजार रुपये ठाणेगाव पोस्ट ऑफिसला येऊन त्यांच्या खाते क्रमांक ८९५७५३८०३२ मध्ये भरण्यासाठी डाकपाल जयश्री टेकाम हिला दिले होते.
तिने रकमेची नोंद
पुस्तकात केली व सही आणि शिक्का मारून दिला, परंतु ही रक्कम शाखा डाकघरच्या हिशेबात घेतली नाही. तसेच, टेकाम हिने बचत खाता ८९५७५३८०३२ मधील रक्कम खातेधारकाची बनावट सही करून ४० हजार रुपये काढले. खातेधारकाला माहीत न करता १० ऑक्टोबर २०२३ ला एक हजार रुपये खातेधारकाच्या खात्यात जमा सुद्धा केले. अशाप्रकारे एकूण ४१००० हजार रुपयांची रक्कम सरकारी खात्यामध्ये जमा न करता आपल्या व्यक्तिगत कामासाठी वापरली.
बनावट सही करून पैसे केले विड्राल
२४ जून २०२२ ला डाकपाल जयश्री टेकाम हिने खाते धारकाची बनावट सही करून तीन हजार रुपये विड्राल केले. खातेधारकांनी त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दिलेली रक्कम खात्यात जमा न करता व्यक्तिगत कामासाठी वापरली. तसेच, बनावट सही शिक्का मारून खातेदार व पोस्ट विभागाची एकूण १ लाख ६३ हजार ५०० रुपयांची अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उपविभागीय डाक निरीक्षक मनिष प्रभू ठवकर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी डाकपाल जयश्री टेकाम हिच्या विरुद्ध शनिवारी विविध कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.
डाकघराच्या हिशोबात रकमेची नोंदच केली नाही
खातेदार कृष्णा गणेश चचाणे रा. मेंढा यांनी २ डिसेंबर २०२३ ला ३५०० रुपये ठाणेगाव शाखा डाकघरला येऊन त्यांच्या सुकन्या समृद्धी खाता क्र. ०१००३१३४३५९८ मध्ये भरण्यासाठी डाकपाल जयश्री टेकाम हिला दिले होते. टेकाम हिने या रक्कमची नोंद पुस्तकात केली व सही आणि शिक्का मारून दिला. परंतु, ही रक्कम शाखा डाकघरच्या हिशेबात घेतली नाही. ३५०० रुपये सरकारी खात्यामध्ये जमा न करता आपल्या व्यक्तिगत कामासाठी वापरली. तसेच खातेदार संगीता अविनाश चोबरे मु. पो. ठाणेगाव यांनी ६ फेब्रुवारी २०२३ ला पाच हजार रुपये आणि एक हजार रुपये ठाणेगाव शाखा डाकघरला येऊन आपल्या बचत खाता क्र. ०१००१२२७४२७० मध्ये भरण्यासाठी जयश्री टेकाम हिला दिले होते. टेकाम हिने या रक्कमेची नोंद पुस्तकात केली सही व शिक्का मारून दिला, परंतु ही रक्कम डाकघर च्या हिशेबात घेतलीच नाही.