नागपूर : धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये पॅकेजिंग विभागात १ ते १३ जूनपर्यंत तयार करण्यात आलेला फटाका वातीचा माल जमा करून ठेवण्यात आला होता. जर तयार झालेल्या फटाक्याच्या वातीचे डब्बे दररोज गोदामात सुरक्षित ठेवले असते तर कंपनीतील स्फोटाची घटना टळली असती. तसेच सर्वांचा जीवही वाचला असता. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या ढीसाळ कारभारामुळेच हा स्फोट घडल्याची धक्कादायक माहिती यापूर्वी कंपनीच्या पॅकेजिंग विभागात काम करणाऱ्या कामगाराने दिली.

धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये एका युनिटमध्ये फटाक्याच्या वाती तयार करण्याचे काम करण्यात येत होते. त्यात एकूण १० कामगार नियमित काम करीत होते. गुरुवारी सकाळच्या पाळीमध्ये प्रांजली मोंदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी), श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे आणि दानसा म्हरसकोल्हे हे नऊ कामगार काम करीत होते. दहावा कामगार एका नातेवाईकाकडे आयोजित एका समारंभाला गेला होता. पॅकेजिंग युनिटमध्ये १ जून ते १३ जूनपर्यंत कामगारांनी तयार केलेल्या फटाक्याच्या वातीची डब्बे एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. तसेच गुरुवारी घटनेच्या दिवशीसुद्धा सकाळपासूनच फटाक्याच्या वाती तयार करून पॅकिंग करण्याचे काम सुरु होते. नियमानुसार प्रत्येक दिवशी सायंकाळी तयार झालेल्या फटाक्याच्या वातीचे डब्बे गोदामात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येत होते. मात्र, गेल्या १ जूनपासून रोज तयार होणारे डब्बे पॅकेजिंग युनिटमध्ये जमा करण्यात आले होते. कोणत्यातरी कारणामुळे पॅकेजिंग युनिटमध्ये आग लागली आणि त्यामुळे मोठा स्फोट झाला. अगदी युनिटच्या बाहेर जाण्याच्या रस्त्यावरील कोपऱ्यात फटाक्याच्या वातीचे डब्ब्यांचाही स्फोट झाल्यामुळे आग लागली. त्यामुळे एकाही कामगाराला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगेत प्रांजली मोंदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी), दानसा म्हरसकोल्हे आणि श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे हे गंभीररित्या भाजल्या गेले. नऊ जणांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला तर श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे यांच्यावर दंदे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जर १३ दिवसांचा तयार झालेला मालाची दररोज विल्हेवाट लावली असती तर आज स्फोटाची घटना घडली नसती आणि कुणाचा जीवही गेला नसता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >>>बटाटा, टोमॅटो आणि कांद्याने केला वांदा, आवक घटल्याने दर वाढले; जेवणाची थाळी…

कंपनी हटविण्याची गावकऱ्यांची मागणी

धामणा या गावाच्या अगदी शेजारीच चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे. कंपनीतील पॅकेजिंग विभागात झालेल्या स्फोटात एवढी जणहाणी झाली. जर भविष्यात कंपनीच्या मोठ्या युनिटला आग लागली तर धामणा हे गाव उद्धवस्त होऊ शकते. चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमुळे संपूर्ण गावालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कंपनी गावाजवळून हटविण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली.

हेही वाचा >>>विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…

हिंगणा पोलिसांची भूमिका संशयास्पद

चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीचा संचालक जय शिवशंकर खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका झाली. तसेच एफआयआरमध्ये प्रांजली मोंदर आणि शितल चटप या दोन मृतकांची नावे चुकवली. तसचे सागर देशमुख याला पोलीस ठाण्यात पाहण्यासारखी वागणूक दिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हिंगणा पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला आहे.