अकोला : हत्येच्या सत्राने अकोला जिल्हा हादरून गेला आहे. गेल्या सात दिवसात तीन वेगवेगळे हत्याकांड घडले. अकोट तालुक्यातील वस्तापूर गावात रात्री उशिरा एका २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली. मंगेश बिहारीलाल ढीगर असे मृतक, तर सेवकराम पतिराम साकोम असे आरोपीचे नाव आहे.

अकोट तालुक्यातील वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला होता. या बाजारात खरेदीसाठी आलेला मृतक मंगेश आणि आरोपी सेवकराम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सेवकरामने वादाचा राग मनात ठेवून रात्रीच्या वेळी मंगेशला एकट्याला गाठले. वादाच्या रागातून मंगेशच्या पोटात आणि छातीवर चाकूने गंभीर वार केले. मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

आरोपीच्या घरासमोर वस्तापूर रस्त्यावर हे हत्याकांड घडले. या प्रकरणात श्रीकांत चैत्राम तोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळतात अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञ पथक, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. आरोपी सेवकराम हा गुंड प्रवृत्तीचा आहे. गावात तो दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके रवाना करून काही तासातच अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

रागाच्या भरात घडले गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या सात दिवसांमध्ये अकोला जिल्ह्यात तीन हत्याकांड घडले आहेत. अकोला शहरात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला मारून टाकले होते. दगडाने ठेचून ३१ मे रोजी ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २ जून रोजी सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची गुंड प्रवृत्तीच्या महेंद्र पवार याने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर अकोट तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. जिल्ह्यात घडलेल्या तिन्ही हत्याकांडाच्या प्रकरणांमध्ये आरोपींचा राग अनावर झाला आणि पुढे अनर्थ घडल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. त्याचे रूपांतर हत्याकांडा सारख्या गंभीर घटनेत झाले. रागाच्या भरात घडत असलेले गुन्हे समाजासाठी चिंताजनक ठरत आहे. यावर गांभीर्याने विचार होऊन समुपदेशन व इतर उपाययोजना करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.