अनंत चतुर्दशीला घरातील गणपतीचे विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे ही घटना घडली. बळीराम विनायक बोबडे (१७ ) असे मृत युवकाचे नाव आहे.सिनगांव जहांगीर हे गाव जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या प्रवण क्षेत्रात येते. बळीराम हा भरत वलगरे ,अजय डोईफोडे, अक्षय डोईफोडे, पवन बोबडे आदी मित्रांसमवेत सायंकाळी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गावाशेजारील नदीवर गेला होता. गणपती विसर्जन करीत असताना बळीराम पाय घसरून नदीत पडला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.

या घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजाचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अंधार जास्त असल्याने सरपंच प्रकाश गिते व गावकऱ्यांनी बॅटरींच्या मदतीने शोध घेतला. मात्र नदी आणि खडकपूर्णा धरणाचे ‘बॅक वॉटर’ मोठ्या प्रमाणात असल्याने सदर युवकाचा शोध लागला नाही.

हेही वाचा : वाशीम : अबब ! शेतात आढळला सात फुटी अजगर ; सर्पमित्रांनी केले वनविभागाच्या स्वाधीन

अखेर मृतदेह सापडला

आज दहा सप्टेंबरच्या सकाळी गावकऱ्यांनी गळाच्या साह्याने शोध घेतला. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान युवकाचा मृतदेह आढळला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे पाठवण्यात आला.