नागपूर : ‘नीट’ ची रद्द झाल्याने नैराश्येत आत्महत्या करणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनीच्या घरी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी तिच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत धीर दिला. त्यानंतर त्यांनी आंदोलनादरम्यान सरकारला धारेवर धरले.
‘हा सरकारने घेतलेला बळी’
मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मनगिया येथील रहिवासी आकांक्षा चतुर्वेदी नागपुरात नीट परीक्षेची तयारी करीत होती. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे तिने २० मे रोजी पांढरोबोडी परिसरातील अजयनगर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मंगळवारी आंदोलनासाठी नागपुरात आले असता आकांक्षाचे वडील कृष्णकुमार चतुर्वेदींसह कुटुंबीयांची भेट घेतली. त्यामुळे त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात विलंब झाला. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी यायला उशिर झाल्याचे कारण स्पष्ट करताना सरकारचे वाभाडे काढले.
ते म्हणाले, ‘नीट’ची परिक्षा रद्द झाली, याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने आकांक्षाने आत्महत्या केली. तिच्या वडीलांनाही आपल्या तरुण आणि कर्तुत्ववान मुलीच्या मृत्यूच्या दू:खातून ह्दयाघात येऊन गेला आहे. ते कॅटरिंगचे काम करत होते. आकांक्षा हीच त्यांच्या कुटूंबाचे भविष्य होती. लहान भाऊ शिक्षण घेत आहे. आता घरी कमविणारा कोणीही नाही. एक महिन्यापूर्वी आकांक्षाने आत्महत्या केली, हा बळी व्यवस्थेने घेतला आहे, सरकारने घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ५०० मिटरवर घटना
नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर आहे. मात्र, इतकी मोठी घटना त्यांच्या घरापासून अवघ्या ५०० मीटरवर घडली, परंतु त्यांनी या पिडीतांच्या घरी भेट देण्याची देखील तसदी घेतली नाही, किंवा साधा फोनही केला नाही. त्यांना वाटत असेल ही ’नीट’मुळे घडलेली घटना आहे, हा केंद्र सरकारचा विषय आहे, पण आकांक्षा तर महाराष्ट्राची मुलगी होती, तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, किमान ‘माणुसकी’ म्हणून मुख्यमंत्र्यांना पिडीतांना एक फोनही करावासा वाटला नाही?, असा प्रश्न दीपके यांनी उपस्थित केला. नीटची परिक्षा रद्द झाली नसती तर आकांक्षा डॉक्टर झाली असती, डॉक्टर होऊन तिच्याकडून समाज व देशाची सेवा घडली असती, मात्र, असे घडले नाही,अशी खंत दीपके यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनीही केली होती केंद्र सरकारवर टिका
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही आकांक्षाच्या आत्महत्येवरून केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली होती. राहुल गांधी यांनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येबाबत ‘एक्स’वर पोस्ट केली होती. राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये “आकांक्षाचा मृत्यू ही आत्महत्या नाही तर मोदींच्या भ्रष्ट आणि ढिसाळ व्यवस्थेचा बळी आहे.”
काँग्रेस नेत्यांनीही केले कुटुंबियांचे सांत्वन
राहुल गांधीच्या आदेशानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांनी चतुर्वेदी परिवाराची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी दिलेला संदेश ही परिवाराला सांगितला. तसेच सरकारच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. या सांत्वनपर भेटीमध्ये चतुर्वेदी परिवार आणि प्रफुल गुडधे यांच्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी ही उपस्थित होते.
