गडचिरोली : शाळेची जर्जर इमारत, अपुऱ्या वर्गखोल्या, वर्गांमध्ये पंख्याचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी ये-जा करण्याची सुविधा नाही आणि दोन वर्षांपासून स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष… एटापल्ली तालुक्यातील डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केल्यानंतर ग्रामीण भागातील शालेय सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, पाहणीच्या अवघ्या एक दिवस आधी पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या वेळी शाळेतील अनेक मूलभूत सुविधांची कमतरता निदर्शनास आली.
शाळेच्या स्वच्छतागृहाची अवस्था अव्यवस्थित असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वीच पत्राद्वारे केली होती. मात्र, त्यानंतरही या सुविधेकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याची बाब समोर आली. पाहणीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी साफसफाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
शाळेच्या इमारतीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. इमारत जर्जर झाल्याने ती निर्लेखित करण्यासाठी २०२३ मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, अद्याप त्यावर अंतिम कार्यवाही झालेली नसल्याची माहिती देण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या ५७ आहे. या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीसाठी केवळ दोन वर्गखोल्या उपलब्ध असल्याने अध्यापनासाठी जागेचीही कमतरता आहे.
शाळा व्यवस्थापन समितीनेही विविध सुविधांसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, मागण्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध सुविधा यांच्यातील तफावत या पाहणीत प्रकर्षाने जाणवली. वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था नसताना कार्यालयात मात्र पंखा असल्याचेही निदर्शनास आले.
दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था पाहणीच्या एक दिवस आधीच करण्यात आल्याची माहिती मिळाली. दौरा होणार असल्याने तातडीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असा आरोप करण्यात आला. ‘एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध करून देता येत असेल, तर त्यासाठी एवढे दिवस का लागले?’, असा सवाल अभिजित दिपके यांनी उपस्थित केला.
शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याचा मुद्दाही या वेळी समोर आला. तसेच काही विद्यार्थी दूरवरून शाळेत येत असून त्यांच्या येण्या-जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली.
पोषण आहाराची व्यवस्था मात्र समाधानकारक असल्याचे पाहणीत दिसून आले. मात्र, एका बाजूला शाळेच्या मूलभूत सुविधांसाठी वर्षानुवर्षे पत्रव्यवहार सुरू असताना, पाहणीच्या पार्श्वभूमीवर काही सुविधा तातडीने उभ्या केल्या जात असतील तर प्रशासनाच्या नियमित देखरेखीचा प्रश्न उपस्थित होतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केवळ शाळा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून सुरक्षित इमारत, पुरेशा वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशी मागणी यावेळी गावकाऱ्यांनी केली.
