नागपूर : सध्या देशात केंद्रीय निवडणूक आयुक्तांविरुद्ध विरोधी पक्षासह कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही दंड थोपटले आहे. दीपके यांच्या नेतृत्त्वात काल, शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयुक्तांवर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवरही ताशेरे ओढण्यात आले. त्यामुळे दीपकेही भाजपच्या निशान्यावर आहे. यावरून आज नागपुरात भाजप नेते व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन दीपके यांना इशारा दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप
मुंबईतील शिवाजी पार्क येथे शुक्रवारी सीजेपीने केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिल्याचे वक्तव्य केले. यावरून भाजप नेते व भाजप नेते व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दीपके यांनी डॉ़ बाबासाहेबांच्या रांगेत पंडित नेहरूंना बसवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून केला. एवढेच नव्हे दीपके यांच्या वक्तव्याचा निषेधही केला. कॉंग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र रचले. संसदेचे दारे डॉ. बाबासाहेबांसाठी बंद केली. पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असे अॅड. मेश्राम म्हणाले. दीपके यांनी माफी मागावी अन्यथा आंबेडकरी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दीपकेंवर तरुणाईला वाम मार्गाने लावण्याचा आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे ज्या संवैधानिक संस्था दिल्या, त्यांच्याच विरोधात आंदोलन बाबासाहेबांना अपेक्षित नाही. संवैधानिक संस्थांविरोधात जनमत तयार करून तरुणांना वाम मार्गाने लावण्याचा विडा दीपके यांनी उचलला आहे, असा आरोपही मेश्राम यांनी केला. ते हे सर्व कुणाच्या इशाऱ्यावर करत आहे, याचा लवकरच शोध लावण्यात येईल. जेन झीने दीपकेंचा हेतू ओळखून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यांना संविधान मान्य नाही, त्यामुळे संवैधानिक संस्थांवर हल्ला केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपनेही आंदोलन केले. परंतु जनहिताला प्राधान्य दिले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने कधी ईव्हीएम किंवा मतचोरीचे आरोप केले नाही. उलट पराभवानंतर नव्या जोमाने जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन केले, असेही अॅड. मेश्राम म्हणाले.
