नागपूर :देशातील चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला. तो विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील पदवीधर मतदारसंघात मिळाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा ३ हजार २७१ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मान मिळवला. वंजारी यांच्या विजयामुळे काँग्रेसला देशभरातील या निवडणुकांमध्ये खाते उघडता आले. विशेष म्हणजे, वंजारी यांच्या वडिलांचा राजकीय प्रवास आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसांतच संपला होता. आता मुलाने दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्याने वंजारी पिता-पुत्रांच्या राजकीय प्रवासातील हा विरोधाभास चर्चेत आला आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान झाले होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले नसल्याचे चित्र दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसला लक्ष्य केले होते. मात्र, महाराष्ट्रातील नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होताच काँग्रेसला एकमेव विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात काँग्रेसने विजय मिळवल्याने या निकालाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
वडिलांच्या आमदारकीचा प्रवास अल्पकाळाचा
अभिजित वंजारी यांचे वडील गोविंदराव वंजारी हे काँग्रेसचे नेते होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. १७ ऑक्टोबर २००४ रोजी मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
निवडणुकीत विजय मिळवूनही गोविंदराव वंजारी यांना आमदार म्हणून दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर त्यांचे पुत्र अभिजित वंजारी यांनी राजकारणात सक्रिय होत स्वतःची ओळख निर्माण केली. शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि काँग्रेसमधील राजकीय सहभागाच्या माध्यमातून त्यांनी पदवीधर मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला.
दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर
अभिजित वंजारी यांनी यापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कोहळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे नागपूरमधील ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील स्पर्धा न राहता भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरली.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी मिळाल्यानंतरही कोहळे यांना विजय मिळवता आला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत वंजारी यांनी आघाडी घेतली आणि अखेर विजय निश्चित केला. या निकालामुळे वंजारी यांनी विधानपरिषदेतील आपले स्थान कायम राखले.
मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसला नागपुरात दिलासा
चार राज्यांतील विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केला होता. मतपत्रिकेद्वारे मतदान झालेल्या २८ जागांपैकी काँग्रेसने किती जागा जिंकल्या, असा सवाल त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नागपूरचा निकाल काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला. देशभरात काँग्रेसला केवळ नागपूरमध्ये विजय मिळाल्याचे वृत्त समोर आले.
नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही येथे आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विजयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. वंजारी यांच्या विजयामुळे काँग्रेसला एका जागेवर यश मिळाले, तर भाजपला नागपुरातील पदवीधर मतदारसंघाची जागा गमवावी लागली.
