वर्धा: नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी हे विजयी घोषित झाले आणि काँग्रेस नेत्यांच्या आनंदी प्रतिक्रिया येणे सूरू झाले. दिग्गज नेते नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीचा उमेदवार असल्याने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यासाठी ही लढाई सोपी नव्हती. त्यात परत मंत्री, आमदार व सज्ज संघटना हाताशी असल्याने भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचे पारडे दर्शनी वरचढ दिसत होते. खुद्द काँग्रेस नेते असलेल्या वंजारी यांच्या पाठीशी असे कवच नव्हते. तसेच विविध जिल्ह्यातील गटबाजी कायम.

अभिजित वंजारी यांचे भवितव्य

भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार अशी ही पक्षीय लढाई या मतदारसंघात पहिल्या दिवसापासून गाजत गेली. वंजारी विद्यमान आमदार असले आणि पक्षाचे उमेदवार असले तरी पण पक्ष म्हणुन त्यांना किती नेते साथ देतील, ही शंकची बाब म्हटल्या जात होती. एकप्रकारे एकला चलो रे असेच वंजारी यांची निवडणुकीतील वाटचाल. पण त्यांना मदत जेव्हढी जाहिररित्या मिळाली त्यापेक्षा अधिक पडद्यामागील सूत्रधार करामतीचे निघाल्याची चर्चा होत आहे. त्यांचाच हा आढावा.

पत्नी डॉ. स्मिता वंजारी

अभिजित वंजारी यांच्या अर्धांगिनी डॉ. स्मिता या स्वतः सिनेट मेंबर व शिक्षण संस्थेच्या संचालक. म्हणजे शैक्षणिक वर्तुळ परिचित. त्यांनी या निवडणुकीत प्रामुख्याने नागपूर ग्रामीण भागातील काटोल, रामटेक, कळमेश्वर व अन्य तालुक्यात भेटी दिल्यात. या ठिकाणी कॉर्नर मिटिंग व स्थानिक संस्था समन्वय त्या साधत. ग्रामीण दौरा आटोपून मग घरी खास नेत्यांशी चर्चा व उणीवा शोधणे. चंद्रपूर शहर मायनस ठरत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी प्रत्यक्ष जात मोर्चेबांधणी केल्याचे ऐकायला मिळाले. जे आपले नाहीत असा शिक्का असलेल्यांना त्यांनी वळते केले, ही खास बाब.

तुषार पेंढारकर

हा चेहरा तसा काँग्रेससाठी अपरिचित. पण कमाल करणारा ठरला. जनसंपर्क यात हातखंडा. संवादी व समजून घेणारा. त्यांनी प्रामुख्याने प्रेस साहित्य व संपर्क हाताळून वंजारी यांच्या प्रचारात बेरजेचे राजकारण साधले. सहाही जिल्ह्यात प्रचारात येणाऱ्या अडचणी येणकेन प्रकारे सोडविण्याची जबाबदारी त्यांचीच. सतत पायाला भिंगरी बांधून कामात अग्रेसर राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे आर्थिक तक्रारी दूर करण्याचे भान त्यांनीच ठेवले.

अंकित प्रवीण हिवरे.

हा वंजारी यांच्या चमूतील सर्वात युवा चेहरा. बेरोजगार मेळावे आयोजन करतेवेळी त्यांचा वंजारी सोबत स्नेह जुळला. तो या निवडणुकीत घट्ट झाला. प्रामुख्याने सोशल मीडिया ही बाब त्यांनी सांभाळली. डॉक्यूमेण्ट्री, कॅम्पेन, फोल्लोवर्स कनेक्ट अश्या बाबी ते सांभाळत. १ कोटी लोकांपर्यंत या माध्यमातून वंजारी हे नाव पोहचविण्यात केवळ २० दिवसात आम्हास यश आले, असे अंकित सांगतात. विविध जिल्ह्यातील सभा नियोजन, वक्ते, स्थळ, अपेक्षित साहित्य यांची जबाबदारी. सोबतच मतदार यादीतील अपरिचित चेहरे शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे, ही कामे हिवरे सांभाळत.

शकील सत्तार व मून

वंजारी यांच्या निवडणूक प्रचारात यांनीही वाटा उचलल्याची माहिती पुढे आली आहे. विद्यापीठ राजकारणात सक्रिय राहलेले शकील सत्तार यांनी प्रामुख्याने अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थात शिरकाव करीत ही लढाई किती महत्वाची हे पटवून देण्याचे काम जिकिरीने केले. या अश्या सर्व संस्थात वंजारी यांचे प्रचार साहित्य वाटप, पदाधिकारी भेटीगाठी, नाराजी दूर करणे, मतदार शोधून त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम सत्तार यांनी केले. तर हर्षल मून यांनी विविध नोंदणी, तांत्रिक सहाय्य व अडचण दूर करणे, बूथ वाटपाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. तांत्रिक अडचण आली की सर्वात प्रथम पुकारा हर्षलच्या नावे होत असे. अशी वंजारी यांची पडद्यामागील चमू. याखेरीज अन्य पण आहेतच, असे हिवरे सांगतात. मुख्य म्हणजे उमेदवार वंजारी हे स्वतः अत्यंत व्यस्त असल्याने याच सहकाऱ्यांना त्यांनी पुर्ण विश्वासाने जबाबदारी सोपविली होती. अखेर विजयाचा गुलाल उधळला आणि हे पडद्यामागील चेहरे मुक्त हास्याने चर्चेत आले.