नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक येथे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांच्या निकालांवरून केलेल्या टिकेवरून टोला लागवला. याशिवाय भाजपवरही हल्ला चढवला.

काय म्हणाले अभिजित वंजारी?

गुरुवारी सकाळी मानकापूर क्रीडा संकुलात विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर आमदार वंजारी प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप गाफिल राहिली असून त्यांनी निवडणुकीचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे खोटे आकडे सांगितले, अशी टीका त्यांनी केली. भाजपच्या इव्हेंटकडे आम्ही लक्ष दिले नाही. आम्ही आमच्या रणनीतीवर भर देत प्रत्येक संघटना, कार्यकर्त्यांना कामाला लावले. संपूर्ण यंत्रणा, नेते त्यांच्या बाजूने (सुधाकर कोहळे ) होती. पण आम्ही ताकदीने लढलो. एकत्रितपणे लढलो, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींबाबत काय म्हणाले वंजारी?

पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करीत निवडणुका मतपत्रिका वापरून घेण्यात आल्यानंतरही काँग्रेसने किती जागा जिंकल्या याचा अंदाज लावण्यास लोकांना सांगितले. मोदी यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक येथे झालेल्या विधान परिषद निवडणुकांच्या निकालांवरून काँग्रेस पक्षावर टीका केली होती. यावर उत्तर देताना आमदार वंजारी म्हणाले, त्यांनी ‘कहा है काँग्रेस’ असे ट्विट केले होते. तर काँग्रेस लोकांच्या मनात आहे, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. पुढील २०२९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नक्कीच जिंकू. राहुल गांधी यांचे मुद्दे आता लोकांना पटत आहे, असे वंजारी म्हणाले.

बालेकिल्ला परत मिळवण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस

अपक्ष नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर स्वार होऊन अभिजित वंजारी यांनी विजयी झेंडा फडकवत विधान परिषदेतील मार्ग मोकळा केला. संपूर्ण यंत्रणा, कार्यकर्त्यांची मोठी फळी व नेत्यांच्या बैठकीच्या सत्रानंतरही भाजपचा पराभव झाला असून त्यांचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला परत मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या बळावर एकूण ६७,२३१ मते वंजारी यांच्या पारड्यात पडली. त्यांनी सुधाकर कोहळे यांना ३,२७१ मतांनी मागे टाकत भाजपचे बालेकिल्ला पुन्हा परत मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

एकहाती विजय?

या निकालानंतर कोहळे यांच्यापेक्षा हा भाजपचा पराभव असल्याची चर्चा रंगली. कोहळे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार ते मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. त्या तुलनेत काँग्रेस नेत्यातील मतभेदामुळे वंजारी यांना एकहाती ही निवडणूक लढावी लागली. त्यामुळे हा अभिजित वंजारी यांचा विजय असल्याची चर्चा रंगली आहे.

सलग विजय, पकड घट्ट

५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांना ६१,७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२,७९१ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत १८,९१० मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. ही निवडणूक त्या तुलनेत चुरशीची झाली. केवळ ३,२७१ मतांनी विजय मिळाला. असे असले तरी सलग विजयाने मतदारसंघावर काँग्रेसची पकड घट्ट तर भाजपची सैल होत असल्याची चर्चा रंगली आहे.