नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेस सह अन्य विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कॉकरोच जनता पार्टी यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. काँग्रेस आणि सीजेपीची यांची एकच मागणी आहे. त्यामुळे सी जे पी सोबत राहुल गांधी यांनी संपर्क केला काय? किंवा दोन्ही पक्ष एकत्र आंदोलन करणार का, असा प्रश्न कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना विचारला असता त्यांनी काँग्रेस सोबत जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. तसेच त्यांच्या पार्टीच्या २५ मिलियन फॉलोअर्स कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही तर ते आमच्यावर विश्वास ठेवणार आहेत असे मोठे विधान केले.

दीक्षाभूमीला भेट व अभिवादन

अभिजीत दिपके यांनी बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर टीका केली. तसेच, निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी सोबत जोडण्याच्या प्रश्नावर पहिल्यांदाच मोठे केले. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा लादण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य होणार नाही, असे दिपके म्हणाले. सामाजिक न्यायाची संकल्पना डॉ. आंबेडकर यांनी मांडली असून, अन्यायग्रस्त प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे हाच आपला विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडीशी विरोध नाही

कॉकरोच जनता पार्टी हा स्वतंत्र गट असल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे आंदोलन करीत आहोत. मात्र, ‘इंडिया’ आघाडी आणि आमच्या मागण्या समान आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे विरोधक नाही, असे दिपके यांनी सांगितले. काँग्रेससोबत जाण्याचा किंवा काँग्रेसने आमच्यासोबत यावे, असा आग्रह धरणे योग्य नाही. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता आंदोलनांवर विश्वास ठेवून लाखो तरुण आमच्याशी जोडले गेले आहेत. देशातील चुकीच्या गोष्टींविरोधात प्रत्येकाने आपापल्या स्तरावर आंदोलन करावे, असे ते म्हणाले. सध्या स्वतंत्र राजकीय पक्ष जाहीर करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्याच्या घटनांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे दिसते. तसेच, मतांची कथित चोरी आणि पश्चिम बंगालमधील मतदार नोंदणीतील कथित अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घेतली नसल्याचा आरोप दिपके यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात नेपाळ किंवा बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केला असल्यास, त्यासंबंधीचे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर करावेत, असे आव्हान दिपके यांनी दिले. परदेशी निधी मिळत असल्याचे आरोपही वारंवार केले जात आहेत. याबाबत पुरावे असतील, तर तेही शहा यांच्याकडे द्यावेत, असे ते म्हणाले.

आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार

आंदोलनांमुळे देशात यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण होईल, असे आरोप केले जात आहेत. मात्र, संविधानाने नागरिकांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे. घटनात्मक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना यादवी युद्धाची उपमा देणे म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे दिपके म्हणाले. ब्रिटिश राजवटीविरोधात महात्मा गांधी यांनीही आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला यादवी युद्ध म्हणणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांची खुशामत करण्यापलीकडे काही केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, अन्यायाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.