नागपूर: मागील २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना शनिवारी सकाळच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. यानंतर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यानंतर दिपके यांनी नागपूरच्या जनतेला एक आवाहन केले आहे. देशभरात आंदोलन सुरू असताना दिपकेंनी नागपूरकरांना केलेल्या आवाहनामुळे आता हा विषय चर्चेचा झाला आहे.

शनिवारी नागपूरच्या आंदोलनात काय झाले?

पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शहरात काढण्यात आलेल्या शांतता मार्चचा मार्ग पोलिसांनी ऐनवेळी बदलला. संविधान चौकातून निघालेला मार्च गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यास मज्जाव करण्यात आल्याने तो झिरो माईलमार्गे पुन्हा संविधान चौकात आणण्यात आला. दिल्लीतील जंतर-मंतर येथील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी संविधान चौक ते महात्मा गांधी पुतळा, सीताबर्डी असा शांतता मार्च आयोजित करण्यात आला होता. या मार्चला सीताबर्डी पोलिसांनी यापूर्वी परवानगी दिली होती. मात्र, ऐनवेळी पोलिसांनी महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत जाण्यास मज्जाव केला.

शांतता मार्चच्या मार्गात बदला का झाला

पोलिसांच्या सूचनेनंतर आयोजकांनी नियोजित मार्गात बदल केला. संविधान चौकातून सुरू झालेला मार्च झिरो माईल चौकातून वळसा घेत पुन्हा संविधान चौकात आणण्यात आला. ‘इन सपोर्ट ऑफ सोनम वांगचुक-अ पीसफुल स्टेप टुवर्ड्स ट्रुथ, जस्टिस अँड फ्रीडम’ या घोषवाक्याखाली या शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध व्यावसायिक आणि नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले होते.

काय म्हणाले दिपके?

अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पक्षाच्या एक्स खात्यावरून हा संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी नागपूरच्या जनतेला आवाहन केले की या लढाईमध्ये तुम्ही साथ द्या. नागपूरमध्ये झालेल्या शांतता मार्चचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच २० जुलैला शांतता मार्गाने मोठे आंदोलन करा. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. अनेकांना दिल्लीमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही नागपूरमध्ये आंदोलन करा, असेही आवाहन केले. यानंतर सोमवारी नागपूरची जनता भर पावसात संविधान चौकात एकवटली आहे. यामध्ये तरुणाई सह वृद्ध पुरुष महिलांचाही मोठा सहभाग आहे. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या ही एकच मागणी आंदोलकांकडून होत आहे.