नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या विजयाची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. भाजपसाठी महत्त्वाच्या नागपुरात मिळालेल्या या विजयाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
मोदींच्या पोस्टमुळे राजकीय चर्चेला उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑक्टोबर रोजी ‘एक्स’वर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचा उल्लेख केला. या निवडणुका मतपत्रिकेद्वारे झाल्याचे नमूद करत काँग्रेसने किती जागा जिंकल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी यांच्या या पोस्टनंतर महाराष्ट्रातील निकालांची चर्चा सुरू झाली. विशेषतः नागपूर विभागातील भाजपचा पराभव आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली होती. मात्र, ती काही वेळातच हटविण्यात आली.
दुसऱ्या पसंतीच्या मतांनी बाजी
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजय मिळविला. नागपूर हा भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जात असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी परिसरातील पदवीधर मतदारसंघातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालांची चर्चा अधिक रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून वंजारी यांच्या विजयाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाणांकडून अभिनंदन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांनी वंजारी यांचे अभिनंदन करताना भाजप, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे खोडून काढणारा हा विजय असल्याचे म्हटले. त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि काँग्रेससाठी केलेल्या समर्पित कार्याचे हे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नागपूर विभागासह पुणे आणि मराठवाडा विभागातील महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनीही वंजारी यांना शुभेच्छा दिल्या. लोकगायिका नेहा सिंह राठोड यांनी बनारस आणि नागपूरमधील निकालावर भाष्य केले.
तेलंगणातील नेत्यांकडून नागपुरात सत्कार
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून ‘चला दिल्ली’ कार रॅली काढण्यात आली आहे. माजी आमदार मयनमपल्ली हनुमंत राव आणि आमदार मयनमपल्ली रोहित यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद येथून सुरू झालेल्या या रॅलीत तेलंगणातील विविध नेते सहभागी झाले आहेत. नागपुरात दाखल झाल्यानंतर या नेत्यांकडून नवनिर्वाचित आमदार अभिजीत वंजारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दत्तात्रयनगर येथील वंजारी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वंजारी यांच्या विजयाला आता राज्याबाहेरील काँग्रेस संघटनेकडूनही महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे.
