नागपूर : रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर पोलीस वेगवेगळे अभियान राबवत असले तरी अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वेगात वाहन चालवल्यामुळे सर्वाधिक अपघात घडल्याची  माहिती

समोर आली आहे. पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत २९ हजार वाहनचालकांवर वेगात गाडी चालवल्यामुळे कारवाई केली असली तरी अशा स्टंटबाजांची संख्या कमी होताना दिसत नाही.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, वाहतूक नियम मोडल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली. तरीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे.  वाहनचालकांना कडक शिस्त लावणे गरजेचे आहे. कारण रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी आपले वाहन जबरदस्तीने पुढे नेण्याच्या प्रयत्नात नेहमीच अपघात होत असतात. यात दुचाकीस्वार आघाडीवर आहेत. सीताबर्डी, फुटाळा, अंबाझरी, कोराडी, कळमना, सोनेगाव आणि अमरावती मार्गावर अनेक दुचाकीस्वार स्टंटबाजी करतात.

भरधाव दुचाकी चालवणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुणांची मोठी संख्या आहे. अल्पवयीन मुलांना पालक महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकीची किल्ली देतात. वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही अनेक अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत असतात. त्यामुळे अनेकदा गंभीर अपघात होऊन अल्पवयीन मुलांचा बळी गेल्याच्या अनेक घटना वर्षभरात घडल्या आहेत.

नागपूर वाहतूक पोलिसांनी  २०२० मध्ये ६९३१ चालकांवर वेगात वाहन चालविल्याबाबत कारवाई केली  तर २०२१मध्ये २२ हजार १५८ चालकांवर दंडात्मक कारवाई केली.  

भरधाव वाहन चालवणाऱ्यांमध्ये ७४ टक्के युवा

भरधाव वाहन चालवणाऱ्यांमध्ये ७४ टक्के युवा वर्ग आहे. नवीन तंत्रज्ञानाने विकसित  वाहनांचा वापर वाढल्यामुळे अपघाताची शक्यता जास्त आहे. तरुणींमध्येही भरधाव वाहने चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये ७२ टक्के युवांचा समावेश आहे.

पाच सेकंद तर धीर धरा

लाल दिवा बंद होण्यास शेवटचे पाच सेकंद बाकी असताना अनेक वाहनचालक गाडी सुसाट पळवतात. भरधाव  वाहन चालवण्यामुळे सिग्नलवर घडलेल्या अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा मोठा असून ‘पाच सेकंद तरी धीर धरा,’ असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

रस्ते अपघातात घट व्हावी, यासाठी वाहतूक पोलीस नेहमी प्रयत्न करतात. दंडात्मक कारवाई केली जाते. अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना डोळय़ासमोर ठेवून अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस जनजागृती करीत आहेत.

अमित डोळस, प्र. सहायक पोलीस आयुक्त.