नागपूर : उदगीर येथे आयोजित ९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या नवकवींच्या निवास व भोजनाची समस्या अखेर सुटली आहे. कवीकट्टा या उपक्रमात सहभागी ज्या कवी- कवयित्रींच्या प्रवासाचे आरक्षण निश्चित आहे अशा सर्वाची  संमेलनादरम्यान गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे कळवले आहे. विशेष म्हणजे, ‘लोकसत्ता’ने १६ एप्रिलच्या अंकात ‘एक दिवसच थांबा नि परत जा!’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर आयोजकांनी सुधारित निर्णय जाहीर केला आहे.

२२  ते २४ एप्रिल दरम्यान हे संमेलन होत आहे. या संमेलनात कवीकट्टय़ात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील नवोदित कवींना आयोजकांनी निमंत्रण पाठवले. त्यात त्यांची प्रवासासह तीनही दिवस निवास व भोजनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर  एकच दिवस व्यवस्था करू, असा सुधारित निर्णय सहभागी सर्व कवींना कळवण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे आम्हाला आधीचा निर्णय बदलावा लागत असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले होते. परंतु, अनेक कवींनी तीन दिवसांचा मुक्काम डोळय़ापुढे ठेवून रेल्वे व बस प्रवासाचे आरक्षण केल्याने उर्वरित दोन दिवस कुठे थांबायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु, आता सहभागी कवींची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊ, अशी ग्वाही आयोजकांनी दिली आहे.

निवासाचे पर्याय अत्यल्प असल्याची कबुली

याबाबत आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात उदगीर येथे निवासाचे पर्याय अत्यल्प असल्याची कबुली दिली आहे. सहभागी होणाऱ्या साहित्यिकांची संख्या व निवासाची व्यवस्था यांचा योग्य ताळमेळ जुळत नसल्याने संमेलनाला येणाऱ्यांनी आयोजकांना ‘सहकार्य’ करावे, अशी विनंतीही या प्रसिद्धी पत्रात करण्यात आली आहे.