एका ९ वर्षांच्या मुलाचे अपहरण व खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन पैकी एका आरोपीने मंगळवारी पोलीस ठाण्याच्या कोठडीतच ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नवीन कामठी पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. रामदास बाबुलाल मडावी (३०) रा. लिहिगाव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

सुजल नेपाल वासनिक रा. लिहिगाव हा मुलगा १६ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता शाळेतून परत आला. त्यावेळी त्याची आई दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने तो जेवण न करता खेळण्यासाठी घराबाहेर निघून गेला. मात्र, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने सर्वत्र शोधशोध करण्यात आली. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी घराशेजारी राहणाऱ्या नागरिकाच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला. त्यावर मुलगा सुखरूप हवा असल्यास १० लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर त्याच्या आईवडिलांसह नागरिकांनी सापळा रचला व काल सोमवारी आरोपीला अटक केली. आरोपी ही सुजलच्या शेजारी राहणार आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या माहितीवरुन सुनील नवनाथ मेश्राम (३८) यालाही अटक करण्यात आली. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यात येणार होते. त्यावेळी मडावी हा कोठडीतील स्वच्छतागृहात गेला. तेथे खाली बसून त्याने ब्लेडने स्वत:चा गळा चिरला. तब्बल १५ मिनीटे होऊनही तो बाहेर न निघाल्याने आरडाओरड झाली व कोठडीत पोलीस शिरले असता पोलिसांनी त्याला उचलले असता त्याच्या गळयातून रक्त सांडत होते. पोलिसांनी त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात व नंतर मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

 

पोलिसांचा तपास अतिशय संथ

मुलगा दहा दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी पोलीस अतिशय संथपणे तपास करीत आहे. गेले नऊ दिवस तर नवीन कामठी पोलिसांकडून कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाहीत. शेवटी मुलाच्या आईवडिलांनी व नागरिकांनी खंडणी मागणाऱ्या आरोपीला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले. एवढया गंभीर प्रकरणात पोलिसांचा तपास कुर्मगतीने सुरू असून स्थानिक पोलीस अधिकारी नागपुरात बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहितीही पुरवित नसल्याचे मंगळवारच्या पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट झाले. सुजलऐवजी एखाद्या श्रीमंत वडिलांचा मुलाचे अपहरण झाले असते तर पोलिसांकडून तातडीने पावले उचलण्यात आल्याचाही आरोप होत आहे.

जीम थाटून मडावी कर्जबाजारी

मडावी याने काही महिन्यांपूर्वी गावांत जीम सुरू केले. जीममध्ये त्याने कर्ज काढून अतिशय महागडे उपकरणे बसवलीत. मात्र, कमाई होत नसल्याने अनेक कर्ज पुरवठादार त्याच्या घरी घेऊन वसूली करीत आहेत. त्यासाठी मडावीने सुजलचे अपहरण करून खंडणी मागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुनील मेश्रामने त्याला फोन करून १० लाख रुपयांची मागणी करायला लावली होती, असे मडावीने पोलिसांना सांगितले आहे.