*  राजीव गांधी जीवनदायी योजना *   दोन रुग्णालयांना नोटीस, अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत गरीब रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शहरातील मेडिटिना आणि क्रिसेन्ट रुग्णालयाला नोटीस बजावली असून मानेवाडा येथील केशव हॉस्पिटलची मान्यता निलंबित केली आहे. शतायू आणि क्रिसेन्ट रुग्णालयाला त्यांनी रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना पैसे परत केले आहेत.

गोरगरीब व गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. त्यात उपचारासाठी शासकीय व काही खासगी रुग्णालयातही उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. उपचाराचे दर निश्चित करून देण्यात आले आहे. यात औषधोपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या आदींचा समावेश आहे. मात्र, खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन वरील कारवाई करण्यात आली आहे. अमरावती येथील अब्दुल रहीम रहेमान यांच्यावर क्रिसेन्ट हार्ट रुग्णालयात वरील योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. संबंधित इस्पितळाने शासनाच्या निर्धारित रकमेपेक्षा ५९ हजार ५०० रुपये जास्त आकारले होते. तसेच नागपूर येथील तुषार सरोदे यांनी शतायू रुग्णालयामध्ये किडनी स्टोनची शस्त्रक्रिया केली होती. त्यांच्याकडून ४० हजार रुपये अतिरिक्त घेण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हा नियंत्रण समितीने दोन्ही इस्पितळांना त्यांनी रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार ते परत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.

दरम्यान, शुक्रवारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सचिन कुर्वे होते. त्यात योजनेच्या संदर्भात आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. समितीकडे एकूण ९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.

केशव रुग्णालयाची मान्यता निलंबित

राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मानेवाडा येथील केशव रुग्णालयाबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन चौकशी केल्यानंतर त्यात तत्थ आढळून आल्यावर रुग्णालयाची मान्यता निलंबित करण्यात आली आहे. तसेच मेडिटिना आणि क्रिसेन्ट रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

रुग्णालयाकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असेल तर याबाबत १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against three hospitals for extra money charged
First published on: 18-03-2017 at 03:12 IST