scorecardresearch

गुन्हेगारीसह अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती आराखडा; पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची माहिती; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

कोणत्या भागात किती खून झाले आणि किती गुंडांना अटक केली, याबाबतची आकडेवारी बघून शहराची ओळख ठरवली जाते.

नागपूर :  कोणत्या भागात किती खून झाले आणि किती गुंडांना अटक केली, याबाबतची आकडेवारी बघून शहराची ओळख ठरवली जाते. मात्र, खुनांच्या घटनांमध्ये जेवढे मृत्यू होत नाहीत, त्यापेक्षा चारपट नागरिक अपघातात जीव गमावतात. वर्षांला सरासरी ५० ते ६० जणांचा खून झाला असेल तर ४०० पेक्षा जास्त जण अपघातात ठार झालेले असतात. त्यामुळे गुन्हेगारीसह अपघातावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही विशेष कृती आराखडा तयार करीत आहोत, अशी माहिती नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते. मगर म्हणाले,  नागपूर जिल्ह्यातून दोन मोठे महामार्ग गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रस्ते एकदम गुळगुळीत आहेत. तसेच देशभरात नागपुरातून मोठी मालवाहतूक होते.

महामार्गामुळेच रस्त्यावर ट्रकची संख्या जास्त आहे. परंतु, जवळपास ९५ टक्के वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते. जुजबी माहितीवरून ते वाहन चालवतात.  वाहतूक नियमांचे योग्यरित्या पालन होत नसल्यामुळेच रस्ते अपघाताला निमंत्रण मिळते. भरधाव वाहन चालवणारे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांची संख्या मोठी  आहे. मानवी चुकांमुळे ९५ टक्के अपघात होतात, तर फक्त ५ टक्के अपघात  यांत्रिक समस्येमुळे होतात, याकडेही मगर यांनी लक्ष वेधले.

४ ते ८ ही धोक्याची वेळ

गेल्या तीन वर्षांची अपघातांची आकडेवारी काढल्यास सर्वाधिक अपघात दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत झाले आहेत. दुपारी बारा वाजता वाहतूकदारांची संख्या वाढते तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. मात्र, ४ ते ८ यावेळेत वाहनचालक खूप घाईत वाहन चालवतात. या वेळेत सर्वाधिक अपघात आणि सर्वाधिक मृत्यू पावल्याची नोंद  आहे.

नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर वर्दळ

नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी, ग्राहकवर्ग मोठय़ा प्रमाणात शहराशी जुळलेला आहे.  ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या लोकांची गर्दी खूप असते. ते सर्व चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने शहरात येत असल्याने रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यातूनही रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे.

सर्वाधिक बळी तरुणांचेच

रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा टक्का युवावर्गाचा आहे. २०१९ मध्ये जिल्हयात १८ ते २५ वयोगटातील ११० जण अपघातात मृत्यू पावले.  ८० महिला आणि तरुणींचा अपघातात बळी गेला आहे. २०२० मध्ये टाळेबंदी असतानाही १८ ते २५ या वयोगटातील ६० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ३०० पुरुष आणि ३४ महिला  तर २०२० मध्ये ३४३ पुरुष आणि ३९ महिला अपघातात ठार झाल्या.

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती

आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या १००० शाळा जिल्ह्यात आहेत. येथे जवळपास ३ लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. हे विद्यार्थीच भावी वाहनचालक आहेत. त्या मुलांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील युवा पिढी केवळ शिक्षितच नव्हे तर प्रशिक्षितही असेल.

कृती आराखडयात या उपाययोजना..

वाहनांचा वेग मोजणाऱ्या यंत्रांचा वापर काटेकोरपणे करणार, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, २२ नव्या डायल ११२ वाहनांना सज्ज ठेवणार, अपघातानंतर प्रतिसाद वेळ कमी करून त्वरित मदत पोहचवणार, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार, अल्पवयीन चालकास ताब्यात घेऊन वाहन जप्त करणार, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे करणार.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action plan accident control including crime information superintendent police visit to loksatta office ysh

ताज्या बातम्या