यवतमाळ : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव सुरू झाला आहे. मात्र त्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मानवांसह पक्षांचाही जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर टांच आणली आहे. येथील मारवाडी चौकात मांजा विक्री करणाऱ्या दुकानात छापा टाकून साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

बंटी नंदकिशोर सिवोटीया (रा. मारवाडी चौक, यवतमाळ) असे गुन्हा नोंद झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. अवैध नायलॉन मांजाच्या वापरामुळे दरवर्षी जीवितहानी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. याचे गांभीर्य ओळखून आगामी नवीन वर्ष आणि मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अवैध मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिले होते.

हेही वाचा – भंडारा : नायलॉन मांजा की धारदार शस्त्र? दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला

हेही वाचा – उमेदवारांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार, वनमंत्री मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय

शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध नायलॉन मांजा विक्रीची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने मारवाडी चौकातील बंटी सिवोटीया याच्या बंटी पतंगवाला या प्रतिष्ठानावर छापा टाकला, यावेळी विविध कंपन्यांचा पाच लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मांजा जप्त केला. बंटी सिवोटीया याच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या या कारवाईने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईची संक्रात आल्याने खळबळ उडाली आहे.