नागपूर : राज्यात कर्जतमधील ३२ हजार वृक्षतोडीविरोधात आंदोलन सुरू असतानाच राज्य वन्यजीव मंडळाने सोमवारी अशाच एका प्रकल्पाला मंजुरी दिली. अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प आता केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाघांच्या भ्रमणमार्गातून वीजवाहिनी टाकण्यासाठी ५ हजार १५२ झाडे तोडली जाणार आहेत.

छत्तीसगड ते महाराष्ट्र

छत्तीसगडमधील रायपूर ते महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडापर्यंत ४०० केव्ही वीजवाहिनी टाकली जाणार आहे. अदानी पॉवरच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील नवेगाव-नागझिरा ते पेंच आणि मध्यप्रदेशातील कान्हा ते छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्रक्षेत्रांना जोडणाऱ्या वाघांच्या मार्गिकेवर परिणाम होणार आहे. यासाठी तब्बल १३६ हेक्टर क्षेत्राचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांपैकी ३,२४४ झाडांचा व्यास ६० सेंटीमीटरपेक्षा कमी, तर १,९०८ झाडांचा व्यास त्यापेक्षा अधिक आहे. वन्यजीवांवरील परिणाम कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी कंपनीला वनविभागाकडे ४ कोटी ४७ लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राला १,६०० मेगावॉट औष्णिक वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे कारण देण्यात आले आहे.

अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यानुसार, देशाच्या विद्युत पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्य वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला असल्याचे राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक एम.एस. रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, अदानी पॉवरच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी इमेल करायला सांगितले. मात्र, ई-मेल ला देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

अन्य प्रकल्पांनाही मंजुरी

पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातील अन्य पायाभूत प्रकल्पासाठी ७१ झाडे तोडण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मँगनीज खाणीला देखील मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ७०.०५ हेक्टर वनजमिनीची आवश्यकता असून पेंच आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या मार्गिकेत हा प्रकल्प आहे. संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासह व्याघ्रामार्गीकेतील अनेक प्रकल्पांचे प्रस्ताव मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी होते.

‘जनुकीय पूल खंडित होण्याचा धोका’

पर्यावरणाला बाधा निर्माण होईल आणि वाघांच्या मार्गिकेला धक्का पोहचेल अशा कोणत्याही प्रकल्पांना मान्यता द्यायला नको. वाघांच्या जनुकीय पुलासाठी या मार्गिका अतिशय महत्त्वाच्या असतात. अशावेळी प्रकल्पांचा अडसर हा जनुकीय पूल खंडित करू शकतो, असे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर म्हणाले.