Adhik Maas space events 2026 : अकोला : अधिक मास १७ मेपासून सुरू होत आहे. या विशेष महिन्यात अवकाशातही अधिक आकर्षक घडामोडींची पर्वणी खगोलप्रेमींना लाभणार आहे. आकाशातील अनेक प्रकारच्या आकर्षक घडामोडींचा आनंद घेता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

सौर व चांद्र मासातील ताळमेळ

अधिक महिना हा सौर व चांद्र मासातील ताळमेळ बसण्यासाठी सुमारे दर पावणे तीन वर्षांनी येतो. चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे, तर सौर वर्षात ३६५ दिवस येतात. दरवर्षी पडणारा ११ दिवसांचा फरक भरुन काढल्याने बहुतांशी सणांतील वेळेतील मेळ साधल्या जातो. ज्या चांद्र महिन्यात सुर्याचा राशी बदल होत नाही, तो महिना अधिक असतो. या वर्षी मे आणि जूनमधील ज्येष्ठ अधिक महिना आला आहे. पुढील अधिक महिना मार्च २०२९‌ मध्ये आणि त्यानंतर ऑगस्ट २०३१ मध्ये येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.

पाच ग्रह दर्शनाला अलौकिक योग

सध्या पश्चिमेला तेजस्वी शुक्र आणि सर्वात मोठा गुरु ग्रह रोज एकमेकांच्या जवळ येताना खूप सुंदर दिसतील. यात २३ मेपासून बुध ग्रह सामील होईल. शनी आणि मंगळ पहाटे दिसत आहेत. याच कालावधीत विदर्भात दक्षिणोत्तर अक्षवृत्तीय स्थितीनुसार क्रमाने सूर्य नेमका डोक्यावर आल्याने माध्यान्ह वेळी शून्य सावली अनुभवता येईल, अशी माहिती दोड यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानक पाच दिवस दिसणार

अवकाशातील आंतरराष्ट्रीय संशोधन स्थानक १८, २९, ३० मे, १ व १४ जूनला दिसणार आहे. १९ व २० मे रोजी चंद्र, शुक्र आणि गुरु ग्रहाचे जवळ असेल. २३ मे रोजी चंद्र मघा, २७ ला चित्रा जवळ आणि ३१ ला याच महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेला ज्येष्ठ तारका चंद्रा आड येईल. १ जूनला गुरु कर्क राशीत ८ जून रोजी सूर्य मृग नक्षत्रात येईल. ९ ला पर्सिड उल्का वर्षाव, तर १० जूनला शुक्र व गुरु अगदी जवळ येतील. अधिक मास अवकाशातील घडामोडींसाठी पोषक ठरणार आहे. आकाशातील हे मनोहारी नजारे आपल्या डोळ्यात साठवून अधिक महिन्यातील दिवसा तप्त वातावरण, तर रात्री ग्रह ताऱ्यांच्या सोबत गारवा अनुभवता येणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.