जनमंचचे पंतप्रधानांना पत्र

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे टाळेबंदीदरम्यान लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात यावे, अशी मागणी करत जनमंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर साथ नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत देशात टाळेबंदी लावण्यात आली होती. सध्या राज्यातील अनेक शहरात करोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.३५ टक्केपर्यंत वाढलेली आहे. राष्ट्रीय स्तरावर भारतीय वैद्यक संशोधन परिषदेद्वारे करण्यात आलेल्या चौथ्या सिरो सव्‍‌र्हेच्या आहवालाप्रमाणे ६७.६ टक्के लोकांमध्ये (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहेत. मात्र करोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले असताना टाळेबंदीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे असंख्य व्यवसाय बाधित झाले आहे. यात पर्यटन व्यवसाय, कॅटरिंग, स्कूल व्हॅनचालक, व्यवसाय आदींना फटका बसला आहे. ग्रामीण आणि शहरातील अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. अनेक लोक रोजीरोटीला मुकलेले आहेत. तिसऱ्या लाटेची वाट बघण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेले निर्बंध तात्कळ हटवण्यात यावे, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.