नागपूर : करोनामध्ये पितृछत्र हरपले, कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्याने भविष्यातील सारी स्पप्ने धुसर वाटू लागली. मात्र, मुलीने बारावीत सर्वाधिक गुण मिळवावे आणि ‘आयआयटी’ला प्रवेश घ्यावा, या वडिलांच्या स्वप्नांनी तिला स्वस्थ बसू दिले नाही. वर्षभर कठोर परिश्रम घेत घवघवीत यश संपादित केले. ही प्रेरणादायी संघर्षकथा आहे, बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण मिळवणाऱ्या अर्कजा संजय देशमुख या विद्यार्थिनीची.

अर्कजा डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. तिने विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण मिळवले. भविष्यात अर्कजाला आयआयटीला प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी ती सध्या जेईई परीक्षेची तयारी करीत आहे. २०२१ मध्ये अर्कजा अकरावीला असताना करोनाच्या दुसऱ्या लाटेत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. ते सरकारी सेवेत होते. वडिलांचे अचानक जाणे सर्वांनाच हादरवून सोडणारे होते. कर्ता पुरुष गेल्याने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, पुढील बारावीचे वर्ष आणि वडिलांचे स्वप्न अर्कजाला स्वस्थ बसू देत नव्हते. अभ्यासाचे योग्य नियोजन करून तिने तयारी सुरू केली. ऑनलाइन शिक्षण आणि महाविद्यालयाच्या सराव परीक्षांचा पुरेपूर उपयोग तिने करून घेतला. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमातून तिने ९६ टक्क्यांसह यश संपादन केले. अर्कजाला दहावीच्या परीक्षेतही ९८ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे जेईई उत्तीर्ण करून आयआयटीला प्रवेश मिळवणारच, असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला. अर्कजाची आई सध्या एका खासगी शिकवणीवर्गामध्ये नोकरीला आहे.