अकोला : आपल्या सर्वांना एकत्रित राज्यात राहायचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. त्यामुळे आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार होणार? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न करीत त्यांनी छगन भुजबळांवर देखील टीका केली.अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ओबीसी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वंचितच्या नेत्या प्रा.अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुजोर व उन्माद असलेली सत्ता उलथवून टाकली. रयतेचे स्वराज निर्माण केले. ज्यामध्ये शेतकऱ्यांना, स्त्रियांना व वंचितांना स्वाभिमानाचे जीवन मिळाले. वर्तमानातील प्रस्थापित राजकारण्यांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची सत्ता घालवून स्वतःची स्वार्थी व भांडवलदारी सत्ता निर्माण करायची आहे. याचा जोरदार विरोध करून संघर्ष केला जाईल. त्यासाठी मोठा लढा उभा करू. शिवबा, जोतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करू, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा >>>नागपूर: ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचा पुनरुच्चार
अर्थव्यवस्था नव्याने उभी करण्याची गरज आहे. ती सर्वसामान्यांच्या आणि शासनाच्या हातात राहायला हवी. सामाजिक लढ्याबरोबर जागृकता उभी केलेल्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, हे पाहण्याची गरज आहे. सरकरी धोरण लोकांना कंगाल करण्याचे आहे, अशी टीका ॲड. आंबेडकरांनी केली. २०२४ ची निवडणूक व्यवस्थित पार पडली, तर नव्या परिवर्तनाची सुरुवात होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक समाजात, धर्मात वंचित समूह असून तो त्यांच्या धर्मातील प्रस्थापितांपेक्षा वेगळं आयुष्य जगत असतो, असे प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या. बैठकीला ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
