नागपूर : उपराजधानीतील सकाळ नागपूरांसाठी काहीशी आर्श्चयाची, काहीशी धक्कादायक आणि काहीशी भीतीदायक ठरली. कारण पहिल्यांदाच नागपूरच्या आकाशात रंगीबेरंगी ‘पॅरामोटर्स’ उडायला लागले. हे नेमके काय? हे कुणालाच कळत नव्हते. यापूर्वी कधीच कुणीही हे नागपुरात पाहीले नव्हते. काही झाले तर नाही ना? मॉकड्रील तर नाही ना? अशा वेगवेगळ्या चर्चांना यावेळी उधाण आले. वाहतूकही जागीच थबकली आणि प्रत्येकानी डोळ्यात आणि भ्रमणध्वनीत ही दृश्ये साठवायला सुरुवात केली.

नागपूर शहरातील रामटेक येथे आता लवकरच नियमित साहसी क्रीडा प्रकाराची सुरुवात होणार आहे. यात पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग यासह इतरही साहसी क्रीडा प्रकार नागरिकांना अनुभवता येणार आहे. त्याची ओळख नागपूरकरांना व्हावी म्हणून मंगळवारी नागपूरच्या आकाशात पॅरामोटरिंग या साहसी क्रीडा प्रकाराची एक झलक सीएसी ऑलराउंडर या साहसी उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या प्रशिक्षीत पायलट यांनी दाखवली.

नागपूरकरांना याची कल्पना नसल्याचे अचानक आकाशात त्यांना हे दृश्य दिसल्याने भीती, आश्चर्य, राेमांच अशा संमीश्र भावना यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आल्या. नागपूरच्या देखण्या फुटाळा तलावावर आकाशात मंगळवारी रोमांचक दृश्य पाहायला मिळाले. काही प्रशिक्षीत पायलट त्यांच्या पॅरामोटर्ससह उड्डाण करत होते. त्यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर जसे की फुटाळा तलाव, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, तेलंगखेडी आणि भरत नगर परिसरावर चित्तथरारक पॅरामोटरींग उड्डाणांचे सादरीकरण केले.

नागपूरच्या आकाशात अचानक सुरू झालेल्या या साहसी कलाकृती पाहून फुटाळा तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. लोकांनी रंगीबेरंगी पॅरामोटर आकाशात उडताना पाहत उत्साहाने स्वागत केले. अनेक जणांनी प्रत्यक्ष पॅरामोटरींग उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. मध्य भारतात पॅरामोटरींग या साहसी क्रीडा प्रकाराची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. ही क्रीडा व रोमांच यांचा अदभुत संगम आहे.

नागपूर व इतर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा यांचे दर्शन आकाशातून घडविण्याचे हे एक अनोखे माध्यम ठरत आहे. हे सर्व उड्डाण प्रकाश चिव्हे, अभय राठोड आणि सुभाष धुर्वे या प्रशिक्षित व प्रमाणित पायलट यांनी केले. योग्य हवामान आणि सुरक्षिततेच्या सर्व उपायांसह, आगामी काळात रामटेक येथून नियमित हवाई साहसी खेळ व पॅरामोटरींग उड्डाणे राबविण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना पॅरामोटरींगचा अनुभव घेता येईल.

तसेच नागपूर आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद लोकांना हवेतून अनुभवण्याची संधी मिळेल, असे सीएसी ऑलराउंडर या साहसी उपक्रमाचे गजानन रिंढे यांनी सांगितले.