मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

न्यायपालिकेत वकिलांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परंतु राष्ट्र आणि देशाचे हित डोळयासमोर ठेवून सामाजिक जाणिवेतून वकिलांनी कार्य करायला हवे. समाजिक जाणिवेतून वकिली करणारे वकील चिरकाल स्मरणात राहतात. तर सामाजिक भावना न जोपासणारे विस्मरणात जातात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी कुलगुरु डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट कनिष्ठ वकील पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाला न्या. भूषण गवई, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाधिवक्ता रोहित देव प्रामुख्याने उपस्थित होते. जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. पैसा कमविण्याचा उद्देश सर्वाचा आहे. मात्र, पैसा कमवित असताना आपले ज्ञान समाजाच्या उपयोगी पडायला हवे. समाजाच्या हिताची चार कामे करायला हवीत. सामाजिक जाणिवेतून काम करणारे वकील चिरकाल स्मरणात राहतात. शिवाय सामाजिक जाणिवेतून काम केल्यास पैसाही चांगला कमावता येऊ शकतो, असेही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले. यावेळी न्या. गवई म्हणाले की, वकिलीचा हा व्यवसाय हा अतिशय पवित्र व्यवसाय आहे. अब्राहम लिंकनपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व कायदे पंडित होते. त्यांनी वकिलीच्या माध्यमातून समाजात आमूलाग्र परिवर्तन घडविले. पैसा कमविण्यासाठी वकिली करीत असताना देशहिताचेही कार्य झाल्यास खूप समाधान मिळते, असेही न्या. गवई म्हणाले.

कनिष्ठ वकिलांना पुरस्कार देऊन गौरविणारे हे पहिलेच पुरस्कार असून यातून कनिष्ठ वकिलांना प्रोत्साहन मिळेल, असे मत महाधिवक्ता देव यांनी व्यक्त केले. यावेळी ६ महिने ते ४ वष्रे वयोगटातील उत्कृष्ट कनिष्ठ वकील पुरस्कार अ‍ॅड. समीर सोनवणे, ४ ते ८ वष्रे वयोगटातील उत्कृष्ट कनिष्ठ वकील प्रवीण अग्रवाल, स्विटी भाटीया आणि उत्कृष्ट विधि वार्ताहर पुरस्कार राकेश घानोडे यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर आणि अंजली भांडारकर यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. पद्मा चांदेकर यांनी केले. आभार अ‍ॅड. रितू कालिया यांनी मानले.