वर्धा : मत्स्यप्रेमी नाना मासे पटकाविण्यात तरबेज असतात. नदीतील व समुद्री मास्यांचे तर नवनवे प्रकार आढळून येतात. म्हणून मत्स्यपुराण खवय्या मंडळीच्या चर्चेत चांगलेच रंगते. पण यातही काही धोके असतात. काही मासे खाण्यास अपायकारक समजले जातात. त्याची विशिष्ट ओळख असते. तसाच हा मासा. त्याचे पालन करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आणि खळबळ उडाली.

आफ्रिकन थाई मागूर

हा मासा धोकादायक म्हटल्या जातो. म्हणून ही कारवाई झाली आहे. आर्वी तालुक्यातील मौजा निंबोली (शेंडे) परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्रतिबंधित ‘अफ्रिकन थाई मागूर’ माशांच्या अवैध मत्स्यपालनावर मोठी कारवाई केली. या कारवाईत शेततळ्यांमधून सुमारे २ हजार ७०० किलो जिवंत मागूर मासे जप्त करून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

मोठी कारवाई झाली

मत्स्यव्यवसायचे प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय, महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली. ही मोहिम मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव, आर्वीचे पोलिस उपनिरीक्षक महेश राठोड, हवालदार मंगेश वाघाडे, चेतन बोरकर, नेरीचे तलाठी अमोल खंडारे, महसूल सेवक अमोल शेंडे, निंबोली (शेंडे) येथील उपसरपंच सुरेखा कदम यांच्या समक्ष पार पडली.

होतो आरोग्यावर वाईट परिणाम

अफ्रिकन थाई मागूर हा मासा दूषित पाण्यात वाढणारा व निकृष्ट खाद्य खाणारा मासा आहे. या माशाच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम संभवतात. मांसाहारी व आक्रमक प्रवृत्तीच्या या माशामुळे स्थानिक प्रजातींना व नैसर्गिक परीसंस्थांना मोठा धोका निर्माण होतो. या माशामुळे स्थानिक प्रामाणिक मत्स्यपालकांना योग्य बाजारपेठ आणि न्याय मिळण्यास अडचण निर्माण होते.

विक्रीस प्रतिबंध आहे

पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या थाई मागूरचे पालन किंवा विक्री प्रतिबंधात्मक आहे. त्यामुळे या माशाची पैदास किंवा विक्री करू नये आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी कोणी थाई मागूरचे पालन किंवा विक्री करत असल्यास योग्य कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळवावे, असे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांनी कळविले आहे.