वर्धा : गांधी विचारानुकूल पर्यावरण जपल्या जावे म्हणून मोठे उद्योग वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यास मनाई आहे. मात्र तरी या गांधी जिल्ह्यात अदानी, टाटा अशी भरजरी वजनदार नावे पाय ठेवत असतील तर भुवया उंचावणारच. विख्यात अदानी समूहाने सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठात भागीदारी घेतली. त्यासाठी खुद्द डॉ. प्रीती अदानी सावंगीत आल्या होत्या. आता टाटा हे नाव वर्धेशी जुळणार. टाटा टेक्नोलॉजी लिमिटेडमार्फत वर्ध्यात कौशल्यवर्धन केंद्र उभारल्या जाणार आहे. यापूर्वी असेच केंद्र कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तरप्रदेश व तेलंगणा या राज्यात उभे झाले आहे.
सेंटर फोर इन्व्हेन्शन, इनोवेशन, इंकुबेशन अँड ट्रेनिंग सेंटर हे महत्वाचे ठरणार. सदर प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये ११५ कोटी इतकी असून एकूण रक्कमेपैकी रुपये ९७. ७५ कोटी रुपयाची रक्कम टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे व उर्वरित खर्च रुपये २०. ३५ कोटी रुपये महामंडळाकडून संचालक मंडळाच्या मान्यतेने उपलब्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित कौशल्यवर्धन केंद्र १४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या इमारतीत उभे करण्यात येणार आहे.
प्रस्तावित कौशल्यवर्धन केंद्र इमारतीचे बांधकाम वर्धा शहरात तातडीने सुरू करण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना निर्देश दिलेले आहेत. सदर प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या बांधकामासह तेथे उपलब्ध होणाऱ्या सर्व मशीनरी, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण होणार आहे व सदरचे प्रशिक्षण केंद्र टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत संचालित करण्यात येणार आहे.
वर्धेतील नियोजित टाटा टेक्नॉलॉजी लि. व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणा-या कौशल्यवर्धन केंद्र मध्ये विशिष्ट अभ्यासक्रमाचा समावेश आहे. सदर कौशल्यवर्धन केंद्रामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षीत मनुष्यबळ यामुळे खालील उद्दिष्टांची पूर्तता करणे शक्य होणार आहे.
- तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधारणा करणे.
- भारतातील कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या केंद्रच्या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण देणे.
- उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल उपलब्ध करून देणे.
- सदर प्रकल्पामुळे कल्याण,डोंबिवली शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
- चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढवण्यासाठी उच्चसत्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे,
- आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीने अद्यावत करणे.
- आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणून तांत्रिक केंद्राची प्रतिष्ठा वाढवणे.
- नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत करणे.
- उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, साधने आणि उपकरण यांची केंद्रामार्फत स्थापना करणे,
- सदर प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या नेतृत्वाखालील इतर उद्योग संघ आणि एमआयडीसी यांचा संयुक्त उपक्रम आहे. प्रकल्पाचे नुतनीकरण हे उद्दिष्ट आहे.
पालकमंत्री डॉ. भोयर म्हणतात की विद्यार्थ्यांना, उद्योग व्यावसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकता निर्माण करण्याचा हेतू आहे. हे केंद्र वर्धा शहरात परिपूर्ण औद्यागिक शिक्षणाचे एक संस्कार केंद्र ठरणार.
