लोकसत्ता टीम नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा नुकताच नागपूर दौरा झाला. त्यानंतर पाचच दिवसाने पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ईश्वर बाळबुधे हे एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करीत होते. पक्षाचा गैरमराठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. पक्षात फूट पडल्यावर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने बाळबुधे हे सुद्धा अजित पवार गटाकडे गेले. पक्षाने त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी व ओबीसी विभागाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली होती. त्यांनी पक्षाचे कामही सुरू केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. आणखी वाचा-‘करिअर अकॅडमी’ने विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडविले; विदर्भासह मराठवाड्यातील पालकांना फटका… लाकडी बहीण योजनेच्या निमित्ताने ३१ ऑगस्टला नागपुरात महिला मेळावा झाला. त्याला अजित पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्राही या निमित्ताने काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्याचे आवाहन या यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र पाचच दिवसाने बाळबुधे यांनी त्यांचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे.त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या क्रियाशील सदस्यत्वाचा, प्रदेश सरचिटणीसपदाचा आणि पक्षाच्या ओबीसी विभागाच्या राज्य समन्वयक पदाचा राजीनामा देत असल्याचे नमुद केले आहे. बाळुबधे यांनी राजीनामा दिल्याने नागपूर, विदर्भात अजित पवार गटाला धक्का बसला आहे. राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी नेते शरद पवार गटात प्रवेश केला आहे. काही येण्याच्या मार्गावर आहे. अजित पवार गटातील काही आमदार पक्ष सोडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाळबुधे यांच्या राजीनाम्याने हे लोण विदर्भात आले की काय अशी चर्चा आहे. अजित पवार यांनी राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांची निवड करताना विदर्भाला वगळल्याने त्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणखी वाचा-राज्यातील १६ जिल्हे ऍनिमिया कुपोषित, मात्र ‘या’ २२ गावांची वाटचाल मुक्ततेकडे… आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरमधून दोन जागा पक्षासाठी सोडाव्या, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे. मात्र त्या जागेवर भाजपचे विद्यमान आमदार असल्याने भाजप या जागा अजित पवार गटासाठी सोडणे अशक्य आहे. दुसरीकडे शरद पवार गट नागपुरात अधिक सक्रिय झाला आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलन केले जात आहे. बाळबुधे यांनी अजित पवार गटाला रामराम केला असला तरी ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप जाहीर केले नाही. ते सुद्धा तुतारी हाती घेऊ शकतात अशी चर्चा आहे.