यवतमाळ : जिल्ह्यास मुघल, निजामशाही, भोसले, गोंड साम्राज्याचा इतिहास आहे. मात्र नव्या संशोधनानुसार यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार वर्षांपूर्वीचे लोहयुग, मध्य पाषाणयुग तसेच सातवाहन काळातील अवशेष आढळल्याने पुरातत्व संशोधकांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक संदर्भ शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे.
इतिहासात डोकावयाचे असेल तर त्यास पुरातत्वीय संशोधनाची जोड द्यावीच लागते. जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड हे गाव पुरातत्वीय संशोधनाने चर्चेत आले आहे. येथे तीन हजार वर्षापूर्वीचे लोहयुगीन, मध्य पाषाणयुग तसेच सातवाहन काळातील अवशेष आढळले. त्यामुळे येथून मानवी सभ्यतेचे विविध पैलू पुढे येणार आहे. इतिहास संशोधक डॉ.विलास वाहणे यांनी २००९ साली पाचखेड या गावाचा अहवाल सादर केला होता. त्यांच्या शोधकार्याने येथे वसलेली सांस्कृतिक धरोहर पहिल्यांदा उजागर झाली. दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रा. डॉ. प्रभास साहू तसेच डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या नेतृत्वात संशोधकांच्या पथकाकडून येथे उत्खनन सुरु आहे.
या स्थळावरील उत्खननानंतर येथे तीन नागरी सभ्यता उदयास आल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. उथळ भांड्यांसह लोखंड वितळवण्याची भट्टी (चूल) सापडली आहे. या सोबतच जेव्हा मानवी वसाहती नव्हत्या; आक्रमणामुळे स्थलांतरण केले जायचे, अशा लोहयुगातील घरांचे पुरावे मिळाले आहे. सुरुवातीच्या ऐतिहासिक काळातील विटांच्या विहिरी येथे आढळल्या आहेत. अनुक्रमे पूर्व लोहयुग, पाषाणयुगाचा प्रारंभ तसेच सातवाहन काळातील अवशेषांचे दर्शन या उत्खननातून घडले आहे. उत्खननातून सापडलेल्या कलाकृतींच्या आधारे सांस्कृतिक क्रम जाणून घेणे आणि प्रदेशातील सुरुवातीच्या वसाहती समजून घेणे हा उद्देश असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पाचखेड येथे उत्खनन सुरु झाल्यापासून गौतम बुद्ध तसेच सम्राट अशोककालीन अवशेष येथे आढळून आल्याची अफवा कुणीतरी पसरवली होती. हीच माहिती बऱ्याच माध्यमांनीही खातरजमा न करता प्रसिद्ध केली. प्रत्यक्षात पाचखेड येथे उत्खननात आढळलेल्या अवशेषांचा हा काळ त्याहून जुना असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
उत्खनन कार्यास निधीची आवश्यकता
भारतीय पुरातत्व खात्याने या स्थळाकडे लक्ष दिल्यास भारताचा प्राचीन इतिहास उलगडण्याची शक्यता आहे. विद्यापीठ स्तरावरील या संशोधन कार्यास वेग देण्याची गरज आहे. विदर्भातील भूमीत लोहयुगीन आणि सातवाहन काळाचा इतिहास दडला आहे. तेव्हा या कार्यास निधी मिळाला तर संशोधन कार्य वेगाने पुढे जाईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला.