चंद्रपूर: उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत काँग्रेस नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याने लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला व प्रचारात विरोधी पक्षनेते तथा जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार काय? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ दरवर्षी प्रमाणे यंदाही शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. पती दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे उमेदवारी मलाच मिळावी असा आग्रह आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. तर वडेट्टीवार यांनी मुलगी प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी तिकीट मागितली. मात्र पक्षाने वडेट्टीवार लोकसभा लढत असेल तर उमेदवारी त्यांना देऊ, अन्यथा आमदार धानोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल. मुलगी शिवानी हिला तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आमदार धानोरकर यांचा मार्ग मोकळा झाला व २४ मार्च रोजी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

दरम्यान उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करीत आरोप प्रत्यारोप केले. आमदार धानोरकर यांनी तर पक्षातील नेत्यांच्या त्रासामुळे पतीचा जीव गेला. एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही असे म्हणत थेट वडेट्टीवार यांना लक्ष्य केले. त्यात भर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी पक्षात मी मी करणाऱ्यांना स्थान नाही असे म्हणून अप्रत्यक्ष वडेट्टीवार यांना लक्ष्य केले. यात शहर अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी देखील मागे राहिले नाही. त्यांनी कुणबी समाजाच्या युवा नेत्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने संपविण्याचा प्रयत्न केला अशी पोस्ट समाज माध्यमावर सार्वत्रिक करीत वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तर कुणबी समाजाच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने एक पत्रक काढून वडेट्टीवार असे वाईट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे वडेट्टीवार कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी यावर अतिशय संयमी प्रतिक्रिया देताना दिवंगत खासदार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सर्वश्रुत आहे हे सांगितले. तसेच जातीपातीचे राजकारण करून पक्षातील लोक अडचणीत आणत असल्याची टीका केली.

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

वडेट्टीवार समर्थकांनी काँग्रेस पक्ष धर्म व जातीचे राजकारण करीत नाही. काँग्रेस सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करू असे सांगितले. आता काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. नागपूर विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार धानोरकर यांनी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना फोन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला येण्याची विनंती करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आमदार धानोरकर यांच्याकडून झालेल्या इतक्या टोकाच्या टीकेनंतर वडेट्टीवार तथा त्यांचे समर्थक येतील का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After extreme criticism will vijay wadettiwar come to fill pratibha dhanorkar campaign and nomination papers rsj 74 ssb
First published on: 26-03-2024 at 10:11 IST