अकोला : मनसैनिक जय मालोकार (२४) याच्या मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अवाहलातून धक्कादायक वळण प्राप्त झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात आले होते. त्यानंतर आता मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याचे जय मालोकार याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.

काय घडले होते ‘त्या’ दिवशी?

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांचा ‘सुपारीबहाद्दर’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची ३० जुलैला अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर तोडफोड करण्यात आली होती. यावेळी मोठा वाद झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या १२ पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी व गुन्हा दाखल झालेले मनसैनिक जय मालोकार यांचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला होता. दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

हे ही वाचा…गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

गंभीर दुखापत, मेंदूत रक्तस्त्राव

मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालामध्ये जय मालोकार यांना विविध भागात गंभीर दुखापत झाली होती, असे नमूद केले. छाती व पाठीवर गंभीर दुखापत होती. छातीच्या चार ते पाच बरगड्या तुटल्या होत्या. मेंदूमध्ये देखील रक्तस्त्राव झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा…गणेश विसर्जनाला गालबोट अन शोककळाही! जळगाव , शेगाव मध्ये संघर्ष; एकाचा अपघाती, युवकाचा बुडून मृत्यू

कुटुंबीयांच्या जीवाला धोका

या गंभीर दुखापतीतून जय मालोकार यांचा मृत्यू झाला असून हृदयविकाराच्या झटक्याने नाही, असा दावा आता कुटुंबीयांनी केला. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व कुटुंबांच्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आता प्रकरणाची नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे.