नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गडकरी यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच नेत्यांनी प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रसद पोहचवली, असा गंभीर आरोप करून मतमोजणीपूर्वी नागपूरचे राजकीय वातावरण तापवले. गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनीही राऊत यांचे आरोप फेटाळले, भाजप नेत्यांनीही राऊत यांच्यावर टीका करीत त्यांचे आरोप खोडसाळपणाचे असल्याचा दावा केला. एकूणच राऊत यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  या पार्श्वभूमीवर सोमवारी गडकरी यांचा वाढदिवस झाला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यास खुद्द फडणवीस गडकरींच्या घरी पोहचले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात नागपूरमध्ये मतदान झाले. गडकरी यांच्या प्रचारासाठी स्वत: फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या, प्रचार मिरवणुकीतही ते सहभागी झाले. फडणवीस यांनी गडकरी यांच्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली. आपल्या मतदारसंघातून गडकरींना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळेल, असा दावा फडणवीस यांनी केला यापूर्वीच केला आहे. फडणवीस यांनी गडकरींच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन फडण‌वीस यांनी  विरोधकांनी दोन नेत्यांमध्ये कटुता निर्माण प्प्रयत्न खोडसाळपणाचा असल्याचा संदेश दिला. मात्र राऊत यांच्या आरोपात सत्यता आहे किंवा नाही हे चार जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष चार जूनकडे लागले आहे. मतमोजणीला एक आठवडा शिल्लक आहे. तोपर्यंत कोण विजयी होणार या चर्चेसोबतच खरच कोणी-कोणाला रसद पोहचवली का  हे सुदधा स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>>ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकाराकडे छापेमारी; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

या प्रश्नांची होत आहे चर्चा

एमआयएएमने नागपूरमध्ये उमेदवार का दिला नाही ? वंचितने नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देण्याचे कारण काय ? कार्यकर्त्यांची फौज आणि आवश्यक ती सर्व सामुग्री उपलब्ध असताना मतदान का वाढले नाही? आदी प्रश्नांची चर्चा निवडणूक प्रचारा दरम्यान होती. मतदानानंतर त्याला पूर्णविराम मिळाला होता. पण राऊत यांच्या चर्चेने ती पुन्हा सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या प्रतिक्रेवरही तर्कवितर्क

संजय राऊत यांच्या आरोपावर भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होत्या. पण तितकीच टोकदार प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांचही आल्याने त्यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहे. राऊत यांनी ठाकरेंचे नाव घेतले नसताना त्यांनी थेट राऊत यांना लक्ष करण्याचे कारण काय ? त्यांच्या प्रतिक्रियेतून ते भाजप नेत्यांची पाठराखण करीत आहे का ? असा सवाल आता कॉंग्रेसचे कार्यकर्तेच करू लागले आहे.

राष्ट्रवादीचीही वादात उडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना  राऊत यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला.