चंद्रपूर : तब्बल सहा दशकानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाला प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार मिळाली आहे.यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी पार पडली. वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून दिल्ली गाठली.

या जिल्ह्याच्या लोकसभेच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या प्रतिभा धानोरकर या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. तब्बल ६० वर्षांनंतर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाली आहे.

हेही वाचा…तब्बल ४० तोळे दागिने व २७ लाखांच्या रोख रकमेवर डल्ला! मानलेला भाऊ व त्याच्या पत्नीने…

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५१ ला देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून चंद्रपूर लोकसभेत १२ महिलांनी निवडणूक लढवली आहे. यामध्ये १९६४, १९६७ मध्ये ताई कन्नमवार, १९८९, १९९१ मध्ये जेष्ठगौरी भवसार, १९९६, १९९८ मध्ये सत्यशीला रायपुरे यांनी दोनदा निवडणूक लढवली आहे, तर १९८० मध्ये प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ जयश्री इंगळे, १९८९ उर्मिला पाठक, १९९१ वीरा सिर्गेवार, १९९९ शोभा पोटदुखे, २००४ तायरा शेख, घोनमोडे, वनिता राऊत यांनी निवडणुका लढवल्या आहेत. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लाल शामशहा यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र, त्यांनी २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा दिला.

हेही वाचा…‘आरटीई’ घोटाळा : शाहिदचा भाऊ राजाला शरीफला रविवारपर्यंत पोलीस कोठडी

या रिक्त झालेल्या जागेवर त्याचवर्षी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ताई कन्नमवार या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या.त्यानंतर ६० वर्षांनी २०२४ च्या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर खासदार म्हणून निवडून आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना लोकसभेमध्ये फारसे प्राधान्य मिळाले नसले तरीही राज्यातील मंत्रीमंडळात महिलांनी विविध मंत्रिपदाची जबाबदारी सामर्थ्यपणे पेलली आहे. यामध्ये काँग्रेसच्या यशोधरा बजाज यांनी राज्यमंत्री म्हणून तर भारतीय जनता पार्टीच्या शोभा फडणवीस यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून भूमिका बजावली. धानोरकरांच्या रुपाने दुसऱ्या महिला खासदार लाभल्या आहे.