प्रसार माध्यमांच्या प्रवेशबंदीवरून विधिसभा गाजली

नागपूर : तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदा होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑफलाईन विधिसभा बैठकीला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी  प्रसार माध्यमांवर प्रवेशबंदी लादली. कुलगुरूंच्या या एकाधिकारशाही विरोधात  विधिसभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी  तीव्र निषेध केला. प्रसार माध्यमांचा आवाज दाबणारे कुलगुरू कोण, असा सवाल करीत माध्यमांना प्रवेश दिल्याशिवाय बैठक चालू देणार नाही, अशी आग्रही मागणी लावून धरली. शेवटी कुलगुरूंनी विशेषाधिकाराचा वापर करीत प्रसार माध्यमांना प्रवेश दिला. 

स्थगित विधिसभा  बुधवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कुलगुरूंच्या एकाधिकारशाही कारभाराविरोधात सदस्यांमध्ये खदखद होती. त्यात कुलगुरूंनी बैठकीमध्ये माध्यमांवर बंदी घालत आणखी विरोध ओढवून घेतला. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी, ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी कुलगुरूंना याबाबत विचारणा केली. विद्यापीठाचा   व्यवहार पारदर्शी असेल तर प्रसार माध्यमांवर बंदी का?, माध्यमांना प्रवेश दिल्याशिवाय सभा चालूच देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.  डॉ. नितीन कोंगरे, अजित जाचक, विष्णू चांगदे यांनीही त्यांना समर्थन दिले. यावेळी कुलगुरूंच्या एकाधिकारशाहीचाही काही सदस्यांनी निषेध केला. तब्बल तासाभराच्या घमासान वादावादीनंतर कुलगुरूंनी अर्धातासाठी सभा तहकूब करीत माध्यमांना प्रवेश देण्याचे मान्य केले.

त्यानंतर सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, या संपूर्ण गोंधळामुळे सभागृहाचा वेळ वाया गेला असून विद्यापीठासारख्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या संस्थेच्या इतिहासात हा काळा दिवस ठरला, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.  बुधवारची सभा स्थगित करण्यात आली असून गुरुवारी दुपारी १ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.

लेखापरीक्षणात १कोटी ५७ लाखांची तफावत

विधिसभेत विद्यापीठाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. यावर व्यवसायाने सनदी लेखापाल व विधिसभा सदस्य  जगदीश जोशी यांनी ताळेबंदामध्ये १ कोटी ५७ लाख ५३ हजार ८०६ रुपयांची तफावत असल्याचा आक्षेप घेतला. यावेळी जोशींनी कुलगुरूंवर गंभीर आरोप केले. मात्र,  कुलगुरूंनी जोशींच्या विधानावर आक्षेप घेत हा विषय वित्त लेखा समितीमधील असल्याने तुम्हाला सभेमध्ये बोलता येणार नाही, असे बजावल्याने  गोंधळ उडाला.

विद्यार्थी संसदेवरूनही वाद

विद्यार्थी संसदेमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलेल्या भाषणाचाही बैठकीमध्ये निषेध करण्यात आला. ज्येष्ठ सदस्य मृत्यूंजय सिंग यांनी यावर सवाल उपस्थित करीत विद्यार्थी संसदेमधून आपण कुठली विचारधारा पेरत आहोत, असे विचारले. यावर उत्तर देताना   आयोजक विष्णू चांगदे यांनी महापौरांनी उदाहरणांदाखल या गोष्टी सांगितल्या असून कुठल्याही एका विचारांचा प्रचार केला नाही, असा खुलासा केला.