अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी आंदोलन केले. यावेळी निकालात होणारा विलंब, शिष्यवृत्तीचा प्रश्न, ‘पेट’ परीक्षेसाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी आदी विषयांवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना घेराव घालण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

अभाविपच्या निवेदनानुसार, पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मागील सत्राच्या परीक्षा होऊन आता ४५ दिवसांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तरीसुद्धा त्यांचे निकाल विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले नाहीत. पुढल्या सत्रात प्रवेश न मिळाल्याने ग्रंथालय व इतर अनेक सुविधांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकत नाही. ‘पेट’ परीक्षेकरिता अर्ज करत असताना जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राकरीता अर्ज केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना अर्जाच्या पावतीवर परीक्षेचा अर्ज भरण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

हेही वाचा- ‘अस्मिता योजने’ला घरघर ; मुली व महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष 

याशिवाय विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना शैक्षणिक विषयासोबतच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता व त्यांच्या सर्वांगिण विकासाला लक्षात घेत गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले ‘आविष्कार’, ‘अश्वमेध’, ‘इंद्रधनुष’ या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल विद्यापीठाने त्वरित विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाविद्यालयात आलेली नाही अशा विद्यार्थ्यांचे कागदपत्र महाविद्यालयांकडून अडविण्यात येत आहेत.

हेही वाचा- नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अधिसंख्य कर्मचा-यांचे उपोषण मागे

या संदर्भात विद्यापीठाने त्वरित सर्व महाविद्यालयांना निर्देशित करावे व कुठल्याच विद्यार्थाचे कागदपत्र अडविण्यात येऊ नये ही सूचना सर्व महाविद्यालयांना द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. परीक्षा संचालक प्रफुल्ल साबळे यांनी निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे आश्वासन दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of abvp against mismanagement of nagpur university dpj
First published on: 04-10-2022 at 09:19 IST