अग्निपथ योजनेवरून देशभरात रान पेटले असताना वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी नागपुरातील माजी सैनिक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावून योजनेचे फायदे सांगितले.

सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केली तेव्हापासून या योजनेला जोरदार विरोध होत आहे. या योजनेनुसार लष्करात भरती झालेल्यांना अग्निवीर असे संबोधले जाणार आहे. ते कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जातील. चार वर्षांनंतर त्यांना कार्यमुक्त केले जाईल. त्यापैकी २५ टक्के अग्निवीरांना सेवेत कायम केले जाणार आहे. संरक्षण दलाच्या तीनही प्रमुखांच्या उपस्थितीत राजनाथ सिंह यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले होते.

या योजनेला विरोध होत असल्याने अखेर वयोमर्यादा वाढवण्यात आली. साडेसतरा ते २१ वर्षे यावरून २३ वर्षे करण्यात आली. करोना काळात दोन वर्षे भरती झाली नाही. त्यामुळे दोन वर्षे वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरी देखील या योजनेचा विरोध थांबलेला नाही. उत्तरेकडील राज्यात हिंसक आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एअर मार्शल विभास पांडे यांनी सोमवारी नागपुरातील निवृत्त अधिकारी, माजी सैनिक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना अनुरक्षण कमानच्या मुख्यालयात निमंत्रण दिले होते. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेची वेगवेगळे पैलू उलगडून सांगितले. हे ऐकून उपस्थितांनी योजना चांगली असल्याचे आणि यासंदर्भात समाजात जनजागृती करणार असल्याचे सांगितले.