नागपूर : नवीन नागपूर अशी ओळख निर्माण होत असलेल्या बेलतरोडी परिसरातील महाकालीनगर झोपडपट्टीला सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत १०० हून अधिक झोपडय़ांची अक्षरश: राख झाली.
या आगीत वेगवेगळय़ा घरातील तब्बल १६ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे दहापेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या नऊ आणि इतर दोन गाडय़ांनी आग विझवली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली.
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या मागील परिसरातील वन विभागाच्या जागेवर महाकालीनगर झोपडपट्टी आहे. सकाळी दहाच्या सुमारास तेथून धुराचे मोठे लोळ निघत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सिलिंडर स्फोटाने परिसर दणाणून गेला. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभागाचे ९ बंब घटनास्थळी पोहचले. कर्मचाऱ्यांनी दीड तास शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे झोपडीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे लाकूड, बांबू, प्लास्टिकचे पत्रे, कापड भक्ष्यस्थानी सापडले. ज्वलनशील साहित्याचा स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरली. आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. जो-तो घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होता. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. झोपडपट्टीत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने अग्निशमन विभागाच्या गांडय़ांनाही अडथळे आले. आग विझवण्यासाठी ९ वॉटर टेंडर, २ वॉटर बाउझर, जवळच्या विहिरीतून पाणी उचलण्यासाठी २ वॉटर लििफ्टग पंप यूनिट, मिहान अग्निशमन सेवेकडून १ वॉटर टेंडर, पोलीस विभागाकडून १ वॉटर कॅनन, महापालिकेच्या जलकुंभ विभागाकडून पाण्याचे टँकर देण्यात आले. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके, स्थानक अधिकारी तुषार बारहाते, राजेंद्र शिरकिरवार, भगवान वाघ, सुनील डोकरे आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी आग विझवली.
एकापाठोपाठ एक स्फोट
झोपडपट्टीतील एका घरात पहिल्यांदा सिलिंडरला आग लागली. पाहता पाहता झोपडी राख झाली. ही आग आजूबाजूच्या झोपडय़ांमध्ये पसरली. एकामागोमाग एक सोळा सिलिंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. आग लागताच झोपडपट्टीतील लोकांनी हाती लागेल ते सामान घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेतली.
९२ घरे जळाल्याचा सरकारी दावा
आगीमध्ये एकूण ९२ घरांचे नुकसान झाले. यात ७७ घरे पूर्णत: तर १५ घरांचे अंशत: नुकसान झाले. ३७५ व्यक्ती बाधित झाल्या. कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शासकीय देय मदत तातडीने पोहचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.