नागपुरात सामायिक विद्याशाखा केंद्र उभारणार

नागपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून जर्मनीच्या सहकार्याने नागपुरात सामायिक विद्याशाखा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. यासाठी जर्मनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

एमएसएमई-डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, नागपूर आणि  भारत सरकारचे एमएसएमई मंत्रालय हे अलायन्स ऑफ इंडियन एमएसएमई यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात एमएसएमई क्लस्टर प्रकल्प राबवत आहेत. यासाठी जर्मनीशी द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. त्यानुसार दीड वर्षांच्या कालावधीत संपूर्ण प्रकल्पाचा खर्च जर्मनी करणार आहे. यादरम्यान एसएमएमईच्या क्षमता वाढीसाठी सामायिक विद्याशाखा केंद्राची निर्मिती केली जाईल. बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसी आणि सरकारी एमएसएमई नागपूर येथील स्थानिक एसएमएसईला बळकट करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याद्वारे स्थानिक उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण केले जाईल. जेणेकरून उद्योगांची उत्पादकता वाढेल.

स्थानिक उद्योगांना आवश्यक असलेल्या औद्योगिक कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी डिसेंबर, २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात नागपुरात तज्ज्ञ येतील.  त्यानंतर येथील २५ प्रतिनिधी बव्हेरिया, जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी  जातील. हे प्रशिक्षण मोफत राहणार आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक (आंतरराष्ट्रीय विभाग,जर्मनी) जेन्स केसर यांनी सांगितले. उद्योगांद्वारे स्वीकारली जाणारी दुहेरी शिक्षणाची ही एक अनोखी संकल्पना आहे, ज्याद्वारे कॉमन फॅकल्टी सेंटरची स्थापना केली जाईल आणि भविष्यात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. हा एक पथदर्शी प्रकल्प आहे. एकदा तो यशस्वीरीत्या अंमलात आणल्यानंतर संपूर्ण भारतात राबवला जाऊ  शकतो, असे आयईडीएस संचालक पी.एम. पारलेवार यांनी सांगितले.