नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून २०२ उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आली आहे. असे असतानाही मागील १० महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही.

‘एमपीएससी’कडून २०२१ मध्ये कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २) ६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. या सर्व उमेदवारांची कागदपत्रे १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी तपासण्यात आली. कागदपत्र तपासणीनंतर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु, नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत आंदोलनही केले. त्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय चर्चेला आला. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे, सरकारने याबाबत सकारात्मक उत्तर दिल्यानंतरही नियुक्ती मिळालेली नाही.

हेही वाचा >>>फडणवीसांच्या शहरात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधातील आंदोलन आणखी तीव्र!

अभिजीत वंजारींकडून कृषिमंत्र्यांची भेट

आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांनी कृषी सेवा परीक्षेतील रखडलेल्या नियुक्त्यांसदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. तसेच यावर तात्काळ तोडगा काढून उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती केली.

परीक्षेचा घटनाक्रम

ऑक्टोबर २०२२ – मुख्य परीक्षा

एप्रिल २०२३ – मुलाखत

१३ एप्रिल २०२३ – गुणवत्ता यादी

जून २०२३ – शिफारस पत्र

ऑगस्ट २०२३ – कागदपत्र पडताळणी

फेब्रुवारी २०२४ – आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन

न्यायालयीन प्रकियेतून तत्काळ तोडगा काढण्यासाठी व निवड प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत रूजू करून घेण्यासाठी २८ जूनला सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता यांची नियुक्ती करण्याचे लेखी आदेश प्रधान सचिन यांना दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.- धनंजय मुंडे, कृषी मंत्री.