२०१८-१९ पासून मेडिकलमध्ये वर्ग सुरू होणार
‘एम्स’च्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारलेल्या अमेरिकन कंपनीने मिहानमधील संस्थेच्या प्रस्तावित जमिनीच्या माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. एम्सच्या संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी डॉ. एस.सी. मिश्रा यांची स्वीकारताच मेडिकलमध्ये २०१८-१९ पासून ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सुरू होणार आहे.
उपराजधानीतील १,५०० ते २,००० कोटींच्या एम्स प्रकल्पाच्या बांधकामाचे कंत्राट अमेरिकातील प्रेकिन्स इस्टमॅन या कंपनीला मिळाले असून देशात प्रथमच एका विदेशी कंपनीनीकडून हे काम केले जाणार आहे. कंपनीच्या तंत्रज्ञांनी मिहानमध्ये प्रस्तावित जागेची पहाणी केली आहे. जमीन समतल करण्यासह माती परीक्षणाचे कामे हाती घेण्यात आले आहे. लवकरच बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, एम्सच्या जागेवर सुरक्षा भिंत बांधण्यासह तेथील चारपदरी मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
एम्सची मेडिकलमध्ये ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी २०१८- १९ मध्ये सुरू करण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. तत्पूर्वी शासनाला मेडिकलमध्ये एम्सच्या अधिकारी व विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र प्रवेशद्वार, स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय, विद्यार्थ्यांकरिता अद्ययावत वर्ग व प्रयोगशाळा, गंभीर रुग्णांकरिता स्वतंत्र खाटा, बाह्य़रुग्ण विभागाची सोय, एम्सच्या संचालकांसह येथील प्रत्येक अधिकारी व विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह व निवासी गाळ्यांची व्यवस्था करायची आहे. त्यादृष्टीनेही काम सुरू होणार आहे.
अमेरिकेतील कंपनीने विविध स्तरावर काम सुरू केले आहे. लवकरच या कंपनीचे अधिकारी स्थायी स्वरूपात नागपूरला राहून बांधकामासह विविध प्रक्रियेला गती देतील. शेैक्षणिक सत्र सुरू करण्याकरिता काम सुरू केले आहे.
– डॉ. विरल कामदार, नागपूरच्या ‘एम्स’चे विशेष प्रतिनिधी.