अकोला : राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक भाजप आणि ‘एआयएमआयएम’ पक्षांचे नगरसेवक सत्ता समीकरणासाठी एकत्र आल्याचा प्रकार अकोट नगरपालिकेत घडल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ‘एआयएमआयएम’ आणि काँग्रेस नकोच, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर आता भाजप नेत्याच्या पुत्राला स्वीकृत नगरसेवक पदासाठी ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. जिल्हा भाजप व आमदार प्रकाश भारसाकळे यांनी संबंधितांचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांनी २०१९ मध्येच भाजप प्रवेश केला असून त्यांच्या पत्नी अकोट नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक देखील होत्या. यानिमित्ताने भाजप व ‘एआयएमआयएम’च्या युतीवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने अकोट विकास मंचाची स्थापना केली. यामध्ये ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांचाही समावेश केला होता. यावरून भाजपवर प्रचंड टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून आघाडी तोडण्याचे आदेश दिले. दरम्यान, भाजपने ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांना बाहेर ठेऊन २१ जणांचा अकोट नगर विकास मंच नव्याने स्थापन केला. त्यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष धरून १२, शिवसेना शिंदे गट एक, शिवसेना ठाकरे गट दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट दोन, राष्ट्रवादी शरद पवार गट एक आणि प्रहारच्या तीन नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे ‘एआयएमआयएम’ पक्षानेही स्वतंत्र गट स्थापन केला. अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी या गटांना मान्यता दिली. ‘एआयएमआयएम’च्या या गटाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी जितेन बरेठिया यांना पाठिंबा दिला. जितेन बरेठिया यांचे वडील रामचंद्र बरेठिया अकोट नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी २०१९ मध्येच विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आज ‘एआयएमआयएम’च्या या गटाने जितेन बरेठिया यांना अकोट नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ‘एआयएमआयएम’ व भाजपच्या संबंधावरून संशयाचे वातावरण तयार झाले.
दरम्यान, जितेन बरेठिया हे भाजपचे सदस्य नाहीत, असे स्पष्टीकरण अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दिले. रामचंद्र बरेठिया आणि जितेन बरेठिया यांचा भाजपशी संबंध नसून ते पक्षाचे सक्रिय सदस्य नाहीत, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी सांगितले.
भाजप पक्षातच कार्यरत
भाजप पक्षामध्येच मी गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. पत्नीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देखील भाजप पक्षाकडे मागितली होती. पूत्र जितेन बरेठिया यांचा मात्र भाजपशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रामचंद्र बरेठिया यांनी दिली.
