अकोला : वाशीम जिल्ह्यात ‘एआयएमआयएम’ पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. कारंजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर ‘एआयएमआयएम’च्या उमेदवारांनी भाजपचा अवघ्या ११७ मतांनी पराभव केला. जिल्ह्यात वाशीम, रिसोड येथे भाजपला यश मिळाले असून मंगरुळपीर येथे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मालेगाव नगरपंचायतमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विजय झाला. जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.

जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड नगरपालिका व मालेगाव नगर पंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. वाशीम येथे २० डिसेंबरला, तर इतर ठिकाणी २ डिसेंबरला मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी निकाल कारंजा नगरपालिकेत लागला. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी ‘एआयएमआयएम’ आणि भाजपमध्ये काट्याची लढत झाली.

फेरमतमोजणीत ‘एआयएमआयएम’ने भाजपला ११७ मतांनी मात दिली. ‘एआयएमआयएम’च्या पुंजानी फरीदाबानू मोहम्मद शफी यांना १६ हजार ८३२ मते मिळाली, तर भाजपच्या निशा गोलेच्छा यांना १६ हजार ७१५ मते पडली. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मंगरुळपीर नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने यश मिळवले. राष्ट्रवादीचे अशोक परळीकर यांनी भाजपचे डॉ. दिलीप रत्नपारखी यांचा चार हजार ४९० मतांनी दारूण पराभव केला.

परळीकर यांना नऊ हजार ०४४, तर डॉ.रत्नपारखींना चार हजार ५५४ मते मिळाली. मालेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गट व काँग्रेसमध्ये लढत झाली. शिवसेनेचे ओमप्रकाश मधुकर खुरसडे यांनी काँग्रेसच्या गणेश रामप्रसाद अहिर यांचा १६४ मतांनी पराभव केला. खुरसडे यांना तीन हजार ७५२, तर अहिरांना तीन हजार ५८८ मते मिळाली. भाजप उमेदवार बळी तिसऱ्या स्थानावर घसरले.

वाशीम नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे.

भाजपचे उमेदवार अनिल केंदळे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सात हजार ९६९ मतांनी पराभव केला. अनिल केंदळे यांना २३ हजार ९४२ मते मिळाले असून त्यांच्या प्रतिस्पर्धी रेखा मापारी यांना १५ हजार ९७३ मतांवर समाधान मानावे लागले. वाशीममध्ये भाजपचे १४, शिवसेना ठाकरे गटाचे १२, ‘एआयएमआयएम’चे तीन, काँग्रेस दोन आणि एक अपक्ष सदस्य निवडून आला आहे. रिसोड नगरपालिके महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. याठिकाणी नगराध्यक्षपदासाठी भाजपचे भगवान क्षीरसागर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे देशमुख यांचा पराभव केला आहे.