अमरावतीत : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक हे मुस्लिमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम सातत्याने करीत आहेत. पण, त्याचा काहीही फायदा होणार नाही. भारताच्या संविधानाने आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मला कुणी कितीही शिव्या दिल्या, तरी त्याचा काही फरक पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एवढे का घाबरतात. मला फोन आला नाही, अन्यथा ‘ट्रेड डिल’ झाली असती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणतात, मला मोदी ‘प्लीज सर’ असे म्हणाले होते, पण पंतप्रधान त्याविषयी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. कारण ट्रम्प हे यांचे मोदी यांचे ‘अंकल’ आहेत, अशी टीका एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका प्रचार सभेत बोलताना केली.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, चीनने आपली एक हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली आहे. पण, चीनला नरेंद्र मोदींचे सरकार म्हणते की भारतात या आणि गुंतवणूक करा. हा तुमचा कोणता राष्ट्रवाद आहे. चीनने आपल्या जमिनीचा ताबा मिळवला आहे, आपण काहीही करू शकत नाही. आपण १५ गस्तीच्या पॉइंटवर जाऊच शकत नाही. चीनसमोर शरणागती पत्करणे हा, कोणता राष्ट्रवाद आहे, याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत.
फडणवीस, शिंदे, पवारांवर टीका
असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली. ओवैसी म्हणाले, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे मुंबईत बसून वडापाव खात आहेत आणि मलई देखील खात आहेत. जेव्हा नगरपालिका निवडणुका झाल्या, तेव्हा हे तिघेही एकमेकांना ओळखत नाहीत, अशा पद्धतीने एकमेकांकडे पाठ करून बसले होते. हैदराबादमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो. हे नाटकबाजी करीत आहेत. अजित पवार हे आपल्या काकांचे झाले नाहीत, ते कुणाचेही होऊ शकत नाहीत. आता ते अमरावतीत येऊन मोठी आश्वासने देत आहेत. पण, माझा त्यांना प्रश्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संविधानाच्या विरोधात वक्फचा कायदा बनवला. हा कायदा अत्यंत धोकादायक आहे. वक्फची संपत्ती बळकावण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवार यांनी या कायद्याचा विरोध का केला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम द्वेषाची आग लावली आहे, ती आपल्याला मतदानाच्या माध्यमातून विझवायची आहे.
