नागपूर : भाजप, शिंदे सेना, अजित पवार यांचे सरकार यायला नको. ते शेतकरी आणि राज्यातील कोणाच्याच हिताचे नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मिळून लढण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांशी चर्चा देखील झाली आहे. परंतु त्यांनी त्यावर विचार करण्यासाठी वेळ मागितला. त्यालाही बराच वेळ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत वाट बघू आणि त्यानंतर पक्षाच्या इच्छुकांना अर्ज वितरित करण्यास सुरुवात करू, असे एआयएमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

जेवढी आमची ताकद तेवढ्या जागा

महाविकास आघाडीच्या काही नेत्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना आम्ही सांगितले, जेवढी आमची ताकद आहे, तेवढ्या जागा आम्ही मागणार. पण, जर आम्हाला सोबत घेणार नसाल तर तुम्ही महाराष्ट्राला एक संदेश देत आहात की, आम्ही त्यांना सोबत घेऊ इच्छित नाहीत, कारण त्यांची महाराष्ट्रात ताकद नाही. जेव्हा की, त्यांना देखील माहिती आहे. एमआयएमचे ठराविक मतदार आहेत.

हे ही वाचा…नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….

त्यांना व्यासपीठावर तीनच खुर्च्या हव्यात

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मानसिता अशी झाली आहे की, व्यासपीठावर केवळ तीन खुर्च्या असतील आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले बसतील. आम्हाला जेथे जेथे सक्षम उमेदवार मिळतील, तेथे आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यापूर्वी आम्ही भाजपला हरवण्यासाठी प्रत्येक पातळीवर तडजोड करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा…गणराय पावले….. पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…….

भाजपला हरवण्यासाठी तडजोडीस तयार

बाबरी मशिद आम्ही पाडली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे वक्तव्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) असलेल्या महाविकास आघाडीसोबत गेलो नाही तर त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपच्या ‘हिटलिस्ट’वर अनेक मशिदी आहेत. त्या मशिदी वाचवण्यासाठी आम्हाला तडजोड करावी लागणार आहे. विचाराधारेमुळे नाहीतर राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांच्यासोबत जावू शकतो. त्यातच महाराष्ट्राचे हित आहे. आम्हाला त्यांची आणि त्यांना आमची विचाराधारा पटत नाही, हे सत्य आहे. पण दोन राजकीय शत्रूपैकी मोठा शत्रू कोण हे बघून निर्णय घ्यायचा असतो, असेही ते म्हणाले. स्वतंत्रपणे किती जागा लढायच्या याचा आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत. विदर्भातील संभाव्य उमेदवारांबाबत विचार सुरू आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीकडून प्रस्तावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीमुळे आम्हाला खूप फायदा मिळेल असे नाही. परंतु आम्ही सोबत नसलो तर त्यांचे खूप नुकसान होणार आहे. याची त्यांना देखील चांगली कल्पना आहे, असेही ते म्हणाले.