scorecardresearch

वायुप्रदूषणाची तपासणी की केवळ औपचारिकता?

उपराजधानीतील वायुप्रदूषणाचा स्तर कमी असल्याचे नेहमीच सांगण्यात येते.

मोजक्या केंद्रावरील नोंदीवरून संपूर्ण शहराचा अंदाज

नागपूर : उपराजधानीतील वायुप्रदूषणाचा स्तर कमी असल्याचे नेहमीच सांगण्यात येते. त्यासाठी शहरातल्या हिरवळीचे कारण देण्यात येते. शहरातील वायुप्रदूषणाचा स्तर मोजण्यासाठी पाच हवा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले असून चार नवे केंद्र उभारले जात आहेत. मात्र, आधीच्या केंद्रांचे ठिकाण आणि आता बसवण्यात येणाऱ्या केंद्राचे ठिकाण यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खरोखरच प्रदूषण तपासायचे आहे, की निव्वळ औपचारिकता पार पाडायची आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, केंद्र स्थापन करण्यासाठी ठिकाण निश्चित केल्याचा दावा मंडळाकडून  करण्यात आला आहे. शहरातील एकूण नऊ केंद्रांपैकी पाच केंद्र ही तीन किलोमीटरच्या परिघात तर दोन केंद्र सिव्हिल लाईनमध्येच आहेत. अशातच पुन्हा नवीन केंद्रांपैकी काही याच परिसरात येत असल्याने अचूक वायुप्रदूषण स्तराबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण सिव्हिल लाईन हा परिसर कमी वर्दळीचा, अधिक हिरवळ असणारा आहे. या परिसरात हवा गुणवत्ता केंद्र असतील तर वायुप्रदूषणाचा स्तर कमीच येण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील या सर्व केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या माहितीची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर करावी लागते. मात्र, सिव्हिल लाईन्समधील उद्योग भवन, विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील केंद्रावरील माहितीच नोंदवली जाते. अन्य केंद्रावरील माहितीच दिली जात नाही. त्यामुळे मोजक्या एक-दोन केंद्रावरील नोंदीवरून संपूर्ण शहराच्या प्रदूषणाचा अंदाज घेणे अनाकलनीय ठरते. सिव्हिल लाईन परिसरातील केंद्रावरून घेतलेली माहिती म्हणजे संपूर्ण केंद्रांची माहिती नाही. कित्येकदा माहितीच नोंदवली जात नाही. २०२१ मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व शहरांची वायुप्रदूषणाची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदवली गेली होती. त्यात नागपूरच्या माहितीचा समावेश नव्हता. केंद्रातून माहिती यायला दोन-तीन दिवसांचा वेळ  लागतो, असे मंडळाकडून सांगण्यात आले होते.  मात्र, प्रत्यक्षात दोन-तीन दिवसानंतरही माहिती नोंदवली गेली नव्हती. डिसेंबर २०२१ मध्ये शहरातील वायू प्रदूषणाचा स्तर अचानक वाढल्याचे दर्शवण्यात आले होते. त्यावर केंद्रात बिघाड झाल्याचे कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय. 

हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय?

हवा गुणवत्ता निर्देशांकात सूक्ष्म धूलिकण, अतिसूक्ष्म धूलिकण यासोबतच सल्फर, ओझोन, कार्बन मोनाक्साईड, लेड आदी घटकही मोजले जातात. शहरात होणारे प्रदूषण हे अतिसूक्ष्म धूलिकणाशी निगडित आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले.

हवेतील धूलिकणांमुळे आरोग्याचे प्रश्न

शहरात बांधकाम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. मेट्रो, उड्डाणपुल, रस्त्याच्या कामांचा यात समावेश आहे. यात अतिसुक्ष्म धुलीकणांचे प्रमाण अधिक आहे. घरे बांधकामासाठी जागा कमी असल्याने शहराची वाढ आडवी कमी आणि उभी (उंच उमारत) अधिक  होत आहे.  त्यामुळे अतिसूक्ष्म धूलिकण हवेतच राहतात. ते श्वासातून शरीरात जातात. त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.

चार ठिकाणी नवे केंद्र

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रासाठी शहरातील चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यात व्हीएनआयटी, एलआयटी, महालमधील नगरभवन (टाऊन हॉल) व मेडिकल चौक या ठिकाणांचा समावेश आहे.  जुने केंद्र सिव्हिल लाईन, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्तर अंबाझरी रोड, िहगणा रोड आणि सदर येथे आहेत.

संपूर्ण शहरातील वायूप्रदूषणाचा स्तर एका ठिकाणावरून मोजला जाऊ शकत नाही. पण  केवळ सिव्हिल लाईन्स केंद्रावरून मिळालेल्या माहितीवरुन हा स्तर ठरवला जातो. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सर्वच केंद्रावरून माहिती संकलित केल्यावरच शहरातील वायुप्रदूषणाचा खरा स्तर कळेल.

– कौस्तुभ चटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ व संस्थापक, ग्रीन विजिल फाऊंडेशन.

नवीन चारही केंद्रांच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. हे केंद्र गर्दीच्याच ठिकाणी हवेत असे नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र स्थापन करण्यासाठी ठिकाण निश्चित केले जाते.

– आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Air pollution inspection formality ysh

ताज्या बातम्या